वृत्तसंस्था, मेलबर्न

माजी विजेत्या अरिना सबालेन्काला ऑस्ट्रेलियन खुल्या ग्रँडस्लॅम टेनिस स्पर्धेच्या तिसऱ्या फेरीचा अडथळा पार करण्यासाठी संघर्ष करावा लागला. मात्र, सलग दोन सेटच्या ‘टायब्रेकर’मध्ये चमकदार कामगिरी करत तिने विजयी घोडदौड कायम राखली. पुरुषांत अग्रमानांकित स्पेनचा कार्लोस अल्कराझ आणि तिसरा मानांकित जर्मनीचा ॲलेक्झांडर झ्वेरेव यांनाही चौथी फेरी गाठण्यात यश आले.

रॉड लेव्हर एरिना येथे झालेल्या सामन्यात पोलंडची अनास्तासिया पोटापोवा हिच्यासह दुपारच्या उष्णतेनेही सबालेन्काची कसोटी पाहिली. चार वर्षांत तिसरे ऑस्ट्रेलियन जेतेपद मिळविण्यासाठी प्रयत्नशील असलेल्या सबालेन्काने मोक्याच्या क्षणी खेळ उंचावला आणि पोटापोवाचे आव्हान ७-६ (७-४), ७-६ (९-७) असे परतवून लावले.

पहिल्या सेटमध्ये सबालेन्का ६-५ अशी आघाडीवर होती. तसेच पुढील गेममध्ये ती ४०-० अशी पुढे होती. मात्र, पोटापोवाने तीनही ‘सेट पॉइंट’ वाचवले आणि सेट ‘टायब्रेकर’मध्ये नेला. यातही सबालेन्काने ३-० अशी आघाडी मिळविल्यानंतर पोटापोवाने दमदार पुनरागमन करताना ३-३ अशी बरोबरी साधली. परंतु यानंतर सबालेन्काने खेळ उंचावत पहिला सेट जिंकला. दुसऱ्या गेममध्ये सबालेन्काला ४-० अशी आघाडी राखता आली नाही. पोटापोवाने हा सेटही ‘टायब्रेकर’मध्ये नेला. यातही तिने सबालेन्काला सहजासहजी गुण जिंकू दिले नाही. अखेरीस ७-७ अशा बरोबरीनंतर सबालेन्काने सलग दोन गुण घेत लढतीत विजय मिळवला.

गॉफची आगेकूच

महिला एकेरीतच तिसऱ्या मानांकित कोको गॉफने अमेरिकेच्याच हेली बाप्टिस्टेला ३-६, ६-०, ६-३ असे पराभूत केले. कॅनडाच्या १९ वर्षीय व्हिक्टोरिया एमबोकोने स्वप्नवत घोडदौड कायम राखताना डेन्मार्कच्या क्लारा टॉसनचा ७-६ (७-५), ५-७, ६-३ असा पराभव केला. चौथ्या फेरीत एमबोकाची गाठ सबालेन्काशी पडेल.

मानांकितांचे यश

पुरुष एकेरीत अल्कराझ आणि झ्वेरेव या मानांकितांनी पुढील फेरी गाठण्यात यश मिळवले. अल्कराझने फ्रान्सच्या कोरेन्टिन मुटेटवर ६-२, ६-४, ६-१ अशी, तर झ्वेरेवने २६व्या मानांकित ब्रिटनच्या कॅमरून नॉरीवर ७-५, ४-६, ६-३, ६-१ अशी मात केली. ११व्या मानांकित डॅनिल मेदवेदेवला तिसऱ्या फेरीचा अडथळा पार करण्यासाठी पाच सेट खेळावे लागले. त्याने हंगेरीच्या फॅबियन मारोझसानला ६-७ (५-७), ४-६, ७-५, ६-०, ६-३ असे पराभूत केले.

पोटापोवा फारच अप्रतिम खेळली. तिला हरवणे निश्चितच सोपे नव्हते. तिने बराच काळ वर्चस्वही राखले होते. मात्र, सर्वोच्च स्तरावर खेळताना काही दिवस असेही असतात, जेव्हा तुम्हाला संघर्ष करावा लागतो. तुम्ही हार न मानल्यास यश मिळविण्याची संधी असते. हेच माझ्याबाबत घडले. ही लढत जिंकू शकले याचा आनंद आहे. –अरिना सबालेन्का