scorecardresearch

ऑस्ट्रेलियन खुली टेनिस स्पर्धा : झ्वेरेव्हला पराभवाचा धक्का; शापोवालोव्हकडून पराभूत; नदाल, मोन्फिस, बार्टी उपांत्यपूर्व फेरीत

नदालने चौथ्या फेरीत फ्रान्सच्या एड्रियन मॅनारिनोला ७-६ (१६-१४), ६-२, ६-२ असे पराभूत केले.

शापोवालोव्हकडून पराभूत; नदाल, मोन्फिस, बार्टी उपांत्यपूर्व फेरीत

टोक्यो ऑलिम्पिकमधील सुवर्णपदक विजेत्या अ‍ॅलेक्झांडर झ्वेरेव्हला ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धेच्या चौथ्या फेरीत पराभवाचा धक्का बसला. १४व्या मानांकित कॅनडाच्या डेनिस शापोवालोव्हने तिसऱ्या मानांकित जर्मनीच्या झ्वेरेव्हला सरळ सेटमध्ये पराभूत करण्याची किमया साधली. स्पेनचा राफेल नदाल आणि ऑस्ट्रेलियाची अ‍ॅश्ले बार्टी या आघाडीच्या खेळाडूंना मात्र उपांत्यपूर्व फेरी गाठण्यात यश आले.

पुरुष एकेरीच्या चौथ्या फेरीत शापोवालोव्हने झ्वेरेव्हवर ६-३, ७-६ (५), ६-३ अशी मात केली. डावखुऱ्या शापोवालोव्हच्या कारकीर्दीतील हा सर्वात मोठय़ा विजयांपैकी एक होता. दुपारच्या सत्रात झालेल्या या लढतीत दोन्ही खेळाडूंना प्रतिस्पर्ध्यासह उष्णतेचाही सामना करावा लागला. शापोवालोव्हने संयमाने खेळ केला, तर दडपणात झ्वेरेव्हचा खेळ खालावला. शापोवालोव्हचा उपांत्यपूर्व फेरीत २० ग्रँडस्लॅम विजेत्या राफेल नदालशी सामना होईल. 

नदालने चौथ्या फेरीत फ्रान्सच्या एड्रियन मॅनारिनोला ७-६ (१६-१४), ६-२, ६-२ असे पराभूत केले. पहिल्या सेटच्या तब्बल २८ मिनिटे रंगलेल्या टायब्रेकरमध्ये मॅनारिनोने नदालला उत्तम लढा दिला. मात्र, नदालने अनुभव पणाला लावत १६-१४ असा विजय मिळवला. त्यानंतर दुसरा आणि तिसरा सेट मोठय़ा फरकाने जिंकत त्याने १४व्यांदा ऑस्ट्रेलियन स्पर्धेची उपांत्यपूर्व फेरी गाठली. तसेच इटलीच्या मॅटेओ बेरेट्टिनीने स्पेनच्या पाब्लो बुस्ताचा ७-५, ७-६ (४), ६-४ असा, तर फ्रान्सच्या गेल मोन्फिसने सर्बियाच्या मिओमिर केचमानोव्हिचचा ७-५, ७-६ (४), ६-३ असा पराभव केला.

महिला एकेरीत अग्रमानांकित बार्टीने अमेरिकेच्या अमांडा अ‍ॅनिसिमोव्हाचे आव्हान ६-४, ६-३ असे परतवून लावले. तिचा उपांत्यपूर्व फेरीत अमेरिकेच्याच जेसिका पेगुलाशी सामना होईल. २१व्या मानांकित पेगुलाने पाचव्या मानांकित ग्रीसच्या मारिया साकारीला ७-६ (०), ६-३ असे नमवले. चौथ्या फेरीच्या अन्य लढतींत, चेक प्रजासत्ताकच्या बाबरेरा क्रेजिकोव्हाने बेलारूसच्या व्हिक्टोरिया अझरेंकाला ६-२, ६-२ अशी धूळ चारली. अमेरिकेच्या मॅडिसन किजने स्पेनच्या पॉला बादोसावर ६-३, ६-१ अशी मात केली.

सानिया-राजीवची आगेकूच

भारताच्या सानिया मिर्झाने तिचा अमेरिकन साथीदार राजीव रामसह ऑस्ट्रेलियन खुल्या स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. सानिया-राजीव जोडीने मिश्र दुहेरीच्या दुसऱ्या फेरीत मात्वे मिडेलकूप आणि एलेन पेरेझ जोडीला ७-६ (८-६), ६-४ असे नमवले. बिगरमानांकित सानिया-राजीव जोडीने हा सामना २७ मिनिटांत जिंकला. सानियाच्या विजयामुळे भारताचे या स्पर्धेतील आव्हान अजूनही कायम आहे.

मी या सामन्यात ज्याप्रकारे खेळलो, त्याबाबत आनंदी आहे.  – डेनिस शापोवालोव्ह

मराठीतील सर्व क्रीडा ( Krida ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Australian open tennis tournament defeat to zverev barty in the semifinals akp

ताज्या बातम्या