ऑस्ट्रेलियन खुली टेनिस स्पर्धा

गतविजेत्या नोव्हाक जोकोव्हिचला बुधवारी ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धेच्या दुसऱ्या फेरीचा अडथळा पार करण्यासाठी कडवा संघर्ष करावा लागला. जोकोव्हिचने अमेरिकेच्या फ्रान्सेस टियाफोचे आव्हान चार सेटमध्ये परतवून लावत पुरुष एकेरीच्या तिसऱ्या फेरीत मजल मारली. मात्र स्टॅनिस्लास वॉवरिंका आणि व्हीनस विल्यम्स यांना स्पर्धेतून गाशा गुंडाळावा लागला.

सर्बियाच्या जोकोव्हिचने पहिला सेट जिंकल्यानंतर दुसऱ्या सेटमध्ये टियाफोने त्याला चांगलेच झुंजवले. मात्र पुढील दोन सेट जिंकत जोकोव्हिचने बाजी मारली. जोकोव्हिचने हा सामना ६-३, ६-७ (३/७), ७-६ (७/२), ६-३ असा जिंकत नवव्या ऑस्ट्रेलियन ग्रँडस्लॅम जेतेपदाच्या दिशेने कूच केली. जोकोव्हिचला तिसऱ्या फेरीत टेलर फ्रिट्झ किंवा रेइली ओपेल्का यांच्यातील विजेत्याशी लढावे लागेल.

तीन ग्रँडस्लॅम जेतेपदांना गवसणी घालणारा स्टॅनिस्लास वॉवरिंका याला पाचव्या सेटमधील टायब्रेकरमध्ये आघाडीचा फायदा उठवता आला नाही. त्याला मार्टन फुकसोविक्स याच्याकडून ७-५, ६-१, ४-६, २-६, ७-६ (९) असे पराभूत व्हावे लागले.

अमेरिकन ग्रँडस्लॅम विजेत्या डॉमिनिक थिम याने जर्मनीच्या डॉमिनिक कोएफरचा ६-४, ६-०, ६-२ असा धुव्वा उडवला. जर्मनीच्या अ‍ॅलेक्झांडर झ्वेरेव्हने मॅक्सिम क्रीजीचा ७-५, ६-४, ६-३ असा पराभव केला.

महिला एकेरीत अमेरिकेच्या व्हीनस विल्यम्स हिला घोटय़ाच्या दुखापतीने सतावल्यामुळे तिचे आव्हान दुसऱ्या फेरीत इटलीच्या सारा इराणी हिने संपुष्टात आणले. इराणी हिने हा सामना ६-१, ६-० असा जिंकला. सेरेना विल्यम्स हिने निना स्टोजानोव्हिक हिला ६-३, ६-० असे हरवत विजयी घोडदौड कायम राखली. जपानची तिसऱ्या मानांकित नाओमी ओसाका हिने कॅरोलिन गार्सिया हिचा ६-२, ६-३ असा सहजपणे धुव्वा उडवत तिसऱ्या फेरीत प्रवेश केला. तिला पुढील फेरीत ओन्स जबेऊर हिच्याशी लढत द्यावी लागेल.

बोपण्णा-मॅकलॅचलन पराभूत

ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धेत भारताला सलग दुसऱ्या दिवशी निराशाजनक कामगिरीला सामोरे जावे लागले. भारताचा रोहन बोपण्णा आणि बेन मॅकलॅचलन यांना पुरुष दुहेरीच्या सलामीच्या लढतीत जी संग नॅम आणि मिन-यू साँग यांनी ४-६, ६-७ (०) असे हरवले. बोपण्णा आणि त्याचा जपानचा सहकारी बेन यांना आपली कामगिरी उंचावता आली नाही. आता भारताच्या आशा दिविज शरण आणि अंकिता रैना यांच्यावर शिल्लक आहेत.

खूपच खडतर सामना होता. फ्रान्सेनने कडवी लढत दिली, त्याच्यासाठी हा सामना संस्मरणीय असेल. पण पहिल्यांदाच मला अशा परिस्थितीचा सामना करावा लागलेला नाही. याआधीही अशा परिस्थितीत दडपण कसे हाताळायचे, याची मला जाणीव आहे. त्यामुळे एक सेट गमावूनही मी पुनरागमन करू शकलो.

– नोव्हाक जोकोव्हिच