scorecardresearch

ऑस्ट्रेलिया खुली टेनिस स्पर्धा : जोकोव्हिचची आगेकूच, मरे पराभूत

ब्रिटनचा आघाडीची टेनिसपटू अॅण्डी मरेची यंदाच्या ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धेतील घोडदौड शनिवारी रॉबटरे बटिस्टा अगुटने रोखली.

ऑस्ट्रेलिया खुली टेनिस स्पर्धा : जोकोव्हिचची आगेकूच, मरे पराभूत

पुरुषांमध्ये रुबलेव्ह, रुन; महिलांत सबालेन्का, प्लिस्कोव्हा उपउपांत्यपूर्व फेरीत

मेलबर्न : ब्रिटनचा आघाडीची टेनिसपटू अॅण्डी मरेची यंदाच्या ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धेतील घोडदौड शनिवारी रॉबटरे बटिस्टा अगुटने रोखली. तर, नोव्हाक जोकोव्हिचने आपली विजयी लय कायम राखताना पुरुष एकेरीची उपउपांत्यपूर्व फेरी गाठली.

तब्बल साडेतीन तास चाललेल्या या लढतीत बटिस्टाने ६-१, ६-७(५-७), ६-३, ६-४ असा विजय मिळविला. मरेला सलग तिसऱ्या लढतीत प्रदीर्घ खेळ दाखवावा लागला. यापूर्वीच्या दोन मॅरेथॉन लढतीत मरेने बाजी मारली होती. मात्र, तिसऱ्या फेरीत ३५ वर्षीय मरे अपयशी ठरला. तिसऱ्या फेरीच्या लढतीनंतर मरे या वर्षी ऑस्ट्रेलियन स्पर्धेत १४ तासाहून अधिक काळ कोर्टवर होता. पहिल्या फेरीत त्याला पाच सेटपर्यंत झुंजावे लागले, तर दुसऱ्या फेरीची लढत तो पहाटे चार वाजेपर्यंत खेळत होता.

विक्रमी दहाव्या विजेतेपदासाठी प्रयत्नशील असलेल्या नोव्हाक जोकोव्हिचने आपली आगेकूच कायम राखली. तिसऱ्या फेरीच्या लढतीत जोकोविचने ग्रिगॉर दिमित्रोव्हचे आव्हान ७-६(९-७), ६-३, ६-४ असे संपुष्टात आणले. या लढतीत जोकोव्हिचला तीन वेळा वैद्यकीय वेळ मागून घ्यावा लागला. जोकोव्हिचची गाठ आता ऑस्ट्रेलियाच्या अॅलेक्स डी मिनॉरशी पडणार आहे. दरम्यान, पुरुष एकेरीत पाचव्या मानांकित आंद्रे रुबलेव्हने चौथ्या फेरीत प्रवेश करताना डॅन इव्हान्सचा ६-४, ६-२, ६-३ असा सहज पराभव केला. रुबलेव्हची गाठ आता नवव्या मानांकित होल्गर रुनशी पडेल. रुनने उगो हम्बर्टला ६-४, ६-३, ७-६ (७-५) असे नमवले.

महिला एकेरीतआर्यना सबालेन्काने सलग आठव्या विजयाची नोंद करताना एलिसे मेर्टेन्सचे आव्हान ६-२, ६-३ असे सहज संपुष्टात आणले. सबालेन्काची गाठ बेलिंडा बेंचिचशी पडणार आहे. कॅरोलिना प्लिस्कोव्हाने वरवरा ग्राचेव्हावर ६-४, ६-२ असा सहज विजय मिळविला.

बालाजी-जीवन दुसऱ्या फेरीत
भारताच्या एम. बालाजी आणि जीवन नेंदुचेझियन जोडीने ऑस्ट्रेलियन टेनिस स्पर्धेत दुसऱ्या फेरीत प्रवेश केला. बालाजी-नेंदुचेझियन जोडीने पाचव्या मानांकित इव्हान डोडिंग-ऑस्टिन क्राजिसेक जोडीचे ७-६ (८-६), २-६, ६-४ असा पराभव केला. ही लढत २ तास २० मिनिटे चालली. मिश्र दुहेरीत सानिया मिर्झा-रोहन बोपण्णा जोडीने जेमी फोर्लिस-ल्युक सेव्हिल्ले जोडीचे आव्हान ७-५, ६-३ असे संपुष्टात आणले.

मराठीतील सर्व क्रीडा ( Krida ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 22-01-2023 at 02:33 IST

संबंधित बातम्या