ऑस्ट्रेलियन खुली टेनिस स्पर्धा : त्सित्सिपास, सबालेंका विजयी; संघर्षानंतर उपउपांत्यपूर्व फेरीत प्रवेश; मेदवेदेव, श्वीऑनटेकची आगेकूच

रॉड लेव्हर एरिना येथे झालेल्या पुरुष एकेरीच्या तिसऱ्या फेरीत ग्रीसच्या चौथ्या मानांकित त्सित्सिपासने फ्रान्सच्या बेनोट पेरीवर ६-३, ७-५, ६-७ (२-७), ६-४ अशी चार सेटमध्ये मात केली.

संघर्षानंतर उपउपांत्यपूर्व फेरीत प्रवेश; मेदवेदेव, श्वीऑनटेकची आगेकूच

जेतेपदासाठी प्रबळ दावेदार मानल्या जाणाऱ्या स्टेफानोस त्सित्सिपास आणि अरिना सबालेंका या खेळाडूंनी शनिवारी ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धेची उपउपांत्यपूर्व फेरी गाठली. याव्यतिरिक्त डॅनिल मेदवेदेव आणि इगा श्वीऑनटेक यांनीही तिसऱ्या फेरीत दमदार विजय नोंदवले.

रॉड लेव्हर एरिना येथे झालेल्या पुरुष एकेरीच्या तिसऱ्या फेरीत ग्रीसच्या चौथ्या मानांकित त्सित्सिपासने फ्रान्सच्या बेनोट पेरीवर ६-३, ७-५, ६-७ (२-७), ६-४ अशी चार सेटमध्ये मात केली. सोमवारी होणाऱ्या उपउपांत्यपूर्व लढतीत त्सित्सिपासची अमेरिकेच्या २०व्या मानांकित टेलर फ्रिट्र्झशी गाठ पडेल. रशियाच्या दुसऱ्या मानांकित मेदवेदेवने वॅन डी झँडस्कल्पवर ६-३, ६-४, ६-२ असे तीन सेटमध्ये वर्चस्व गाजवले. गतउपविजेत्या मेदवेदेवचा पुढील फेरीत मॅक्सिम क्रेसीशी मुकाबला होईल. रशियाच्या पाचव्या मानांकित आंद्रे रुब्लेव्हला स्पर्धेतून गाशा गुंडाळावा लागला. क्रोएशियाच्या २७व्या मानांकित मरिन चिलिचने रुब्लेव्हला ७-५, ७-६ (७-३), ३-६, ६-३ असे नमवले. चिलीच आणि नववा मानांकित फेलिक्स अलिसीमे पुढील फेरीत आमनेसामने येतील. कॅनडाच्या २१ वर्षीय फेलिक्सने डॅन एव्हान्सवर ६-४, ६-१, ६-१ असा विजय मिळवला.

महिला एकेरीत बेलारुसच्या दुसऱ्या मानांकित सबालेंकाने चेक प्रजासत्ताकच्या ३१ व्या मानांकित मार्केटा व्होंड्रूसोव्हाला ४-६, ६-३, ६-१ असे पिछाडीवरून नमवले. सबालेंकापुढे पुढील लढतीत काया केनेपीचे आव्हान असेल. पोलंडच्या सातव्या मानांकित श्वीऑनटेकने डॅरिया कॅस्टकिनावर ६-२, ६-३ असे सहज वर्चस्व गाजवले. याव्यतिरिक्त रोमानियाच्या सिमोना हॅलेपनेही पुढील फेरी गाठली.

मिश्र दुहेरीतही बोपण्णा पराभूत

भारताचा अनुभवी टेनिसपटू रोहन बोपण्णा आणि त्याची क्रोएशियन सहकारी डॅरिया जुराक यांना मिश्र दुहेरीतील पहिल्याच फेरीतून गाशा गुंडाळावा लागला. आंद्रे गोलूबेव्ह आणि खिचेनॉक यांच्या जोडीने बोपण्णा-जुराक यांना १-६, ६-४, ११-९ असे पराभूत केले. बोपण्णाच्या पराभवामुळे मिश्र  दुहेरीत फक्त सानिया मिर्झा ही एकमेव भारतीय खेळाडू शिल्लक आहे.

मराठीतील सर्व क्रीडा ( Krida ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Australian open tennis tournament tsitsipas sabalenka advance to the semifinals akp

Next Story
भारत-आफ्रिका एकदिवसीय मालिका : प्रतिष्ठेसाठी झुंज!; भारताचा आज आफ्रिकेविरुद्ध तिसरा एकदिवसीय सामना
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी