ऑस्ट्रेलिया आणि बांगलादेश या दोन्ही संघांमध्ये २ कसोटी सामन्यांची मालिका सुरू आहे. या मालिकेतील पहिल्या सामन्यातील पहिल्याच दिवशी पाहुण्या बांगलादेश संघाने ऑस्ट्रेलियाचा चांगलाच समाचार घेतला. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या ऑस्ट्रेलियाचा संघ अवघे ५३ षटकं फलंदाजी करू शकला. एकट्या स्टीव्ह स्मिथने ऑस्ट्रेलियाकडून खिंड लढवली. स्मिथने ७१ धावांची खेळी केली. तर इतर कुठलेही फलंदाज मोठी खेळी करू शकला नाही. ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव अवघ्या १९८ धावांवर आटोपला. यासह ऑस्ट्रेलियाच्या नावे नकोशा रेकॉर्डची नोंद झाली आहे.
डार्विनमध्ये सुरू असलेल्या या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्सने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पण ऑस्ट्रेलियाला हवी तशी सुरुवात करता आली नाही. ट्रॅव्हिस हेड आणि जॅक वेदराल्डने मिळून पहिल्या विकेटसाठी ४५ धावा जोडल्या. पण त्यानंतर विकेट्सची रांग लागली. हेड २२ तर वेदराल्ड अवघ्या २३ धावांवर माघारी परतला.
मार्नस लबुशेन १, कॅमेरुन ग्रीन अवघ्या १३ धावा करून माघारी परतला. ॲलेक्स कॅरीने १९ आणि ब्यू वेब्स्टरने १२ धावांची खेळी केली. एका बाजूने विकेट्स जात होते. पण स्टीव्ह स्मिथने आपल्या अनुभवाचा पुरेपूर फायदा घेत एक बाजू धरून ठेवली होती. स्मिथने ७१ धावांची खेळी केली. या खेळीच्या बळावर ऑस्ट्रेलियाने १५० धावांचा पल्ला गाठला. पॅट कमिन्स ९ आणि मिचेल स्टार्क १ धाव करून माघारी परतला.
ऑस्ट्रेलियाच्या नावे नकोशा रेकॉर्डची नोंद
या सामन्यात १९८ धावांवर ऑलआऊट होताच ऑस्ट्रेलियाच्या नावे नकोशा रेकॉर्डची नोंद झाली आहे. ही बांगलादेशविरुद्ध खेळताना ऑस्ट्रेलियाची सर्वात कमी धावसंख्या आहे. तसेच ही डार्विनच्या मैदानावरही ऑस्ट्रेलियाची सर्वात छोटी धावसंख्या आहे. याआधी २१७ ही ऑस्ट्रेलियाची बांगलादेशविरुद्ध खेळताना सर्वात कमी धावसंख्या होती. हा रेकॉर्ड २०१७ मध्ये बनवला गेला होता. पहिल्या डावात २१७ धावांवर ऑलआऊट झाल्यानंतर दुसऱ्या डावात ऑस्ट्रेलियाचा डाव अवघ्या २४४ धावांवर आटोपला होता.
