ऑस्ट्रेलियाची अष्टपैलू क्रिकेटपटू अॅशले गार्डनर वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. अॅशले आणि मोनिरा राईट यांचं लग्न झालं होतं. मात्र त्या दोघींनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला होता. मोनिकाने इन्स्टाग्राम पोस्टच्या माध्यमातून आपलं म्हणणं मांडलं आहे.
माझ्या पत्नीने मला फसवलं आहे. अॅशलेचं ऑस्ट्रेलियाच्या संघातील सहकारी जॉर्जिआ वॉलशी अफेअर आहे. तिच्यामुळेच अॅशलेनं मला फसवलं अशा शब्दात मोनिकाने आपल्या भावना मांडल्या आहेत. ‘डेली मेल’ वृत्तपत्राने अॅशले आणि मोनिका विभक्त झाल्याचं वृत्त दिलं होतं. त्यानंतर मोनिकाने आपलं म्हणणं मांडलं आहे.
डेली मेलने बातमीचा उल्लेख करताना विभक्त होत असल्याच्या बातम्यांना अर्थ नसल्याचं म्हटलं होतं. मात्र त्याच स्टोरीत तिने वॉलचं नाव घेतलं. वॉलमुळेच अॅशलेने मला फसवलं आणि सोडलं असं मोनिकाचं म्हणणं आहे.
मोनिकाने तिच्या अकाऊंटवरून अॅशलेबरोबरचे सगळे फोटो डिलिट केले आहेत. दरम्यान अॅशले तसंच वॉल या दोघींपैकी कोणीही मोनिकाच्या आरोपांना जाहीरपणे उत्तर दिलेलं नाही. क्रिकेट ऑस्ट्रेलियानेही यासंदर्भात काहीही भाष्य केलेलं नाही.
एप्रिल २०२५ मध्ये मोनिका आणि अॅशले यांचं लग्न झालं होतं. या लग्नाला ऑस्ट्रेलियाच्या संघातील अनेक खेळाडू उपस्थित होते. मात्र लग्नानंतर दोनच महिन्यात या दोघींमधले संबंध बिघडले असं डेली मेलच्या बातमीत म्हटलं होतं. अॅशले तेव्हा वर्ल्डकपसाठी भारतात होती. संघातील सूत्राने दिलेल्या माहितीनुसार काहीतरी गडबड असल्याचं सहकाऱ्यांच्या लक्षात आलं. मोनिका वर्ल्डकप सुरू असतानाच अॅशलेला भेटण्यासाठी भारतात आली. दोघांमधील संबंध दुरावलेले वाटले असं सूत्रांनी सांगितलं. मात्र वर्ल्डकपचं दडपण असेल असं वाटून दुर्लक्ष केलं.
मायदेशी परतल्यानंतर मोनिका आणि अॅशले यांनी एकमेकांशी संवाद साधला. यानंतर दोघींनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला. अॅशलेच्या निर्णयाने मोनिकाला उद्धव्स्त झाल्यासारखं वाटलं. भारत दौऱ्यादरम्यान काय झालं हे अॅशलेने मोनिकाला सांगितलं.
अॅशले आणि मोनिका अपत्याचा विचार करत होते. याकरता त्यांनी इनफर्टिलिटी क्लिनिकमध्ये अपॉइंटमेंटही घेतली होती. विभक्त होण्याचा निर्णय घेतल्यामुळे हे सगळंच विस्कटलं. अॅशलेने ते घर सोडलं आणि लग्नाची अंगठीही तिथेच ठेवली. या दोघींच्या विभक्त होण्याच्या बातमीने ऑस्ट्रेलियाच्या संघातही खळबळ उडाली कारण मोनिकाचे संघातील अनेकींशी ऋणानुबंध तयार झाले होते. अॅशले आणि मोनिका विभक्त होण्याची क्रिकेट ऑस्ट्रेलियाला कल्पना होती असं डेली मेलच्या बातमीत म्हटलं आहे. यासंदर्भात त्यांना विचारलं असता क्रिकेट ऑस्ट्रेलियाचे वरिष्ठ कम्युनिकेशन प्रमुख रिचर्ड हिंड्स यांनी काहीही बोलण्यास नकार दिला.
अॅशले ऑस्ट्रेलियाची उपकर्णधार असून, ८ टेस्ट, ९३ वनडे आणि १०६ टी२० सामन्यात तिने ऑस्ट्रेलियाचं प्रतिनिधित्व केलं आहे. ऑस्ट्रेलियासाठी खेळणाऱ्या मूळ रहिवासी अर्थात अबॉरिजिनल्स समाजाची ती प्रतिनिधी आहे. आतापर्यंत फेथ थॉमस, जस्टीन गिलेस्पी, स्कॉट बोलँड आणि अॅशले गार्डनर अशा या समाजातील चौघांनी ऑस्ट्रेलियाचं प्रतिनिधित्व केलं आहे. महिला क्रिकेटमधल्या अव्वल अष्टपैलू खेळाडूंमध्ये तिची गणना होते.
