मिचेल स्टार्क,जोश हेझलवूड, पॅट कमिन्स आणि नॅथन लॉयन या चौकडीने एक अनोखा विक्रम नावावर केला आहे. ऑस्ट्रेलियाच्या या चौकडीने एकत्र खेळताना ३८ कसोटीत ६०६ विकेट्स पटकावण्याची किमया केली आहे. कसोटी क्रिकेटच्या १४९ वर्षांच्या इतिहासात एका चौकडीने इतक्या विकेट्स पटकावण्याची ही पहिलीच वेळ आहे.

ऑस्ट्रेलियाचा संघ दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर आहे. डरबान कसोटीपूर्वी चौकडीने एकत्रित खेळताना ५९९ विकेट्स पटकावल्या होत्या. दक्षिण आफ्रिकेच्या डावाला खिंडार पाडत चौकडीने विक्रम नावावर केला. एकत्र खेळताना कमिन्सने १६० तर स्टार्कने १५५ विकेट्स पटकावल्या आहेत. हेझलवूडने १५२ तर लॉयनने १४० विकेट्स घेतल्या आहेत.

याआधी जेम्स अँडरसन, स्टुअर्ट ब्रॉड, बेन स्टोक्स आणि मोईन अली या चौकडीने एकत्रित खेळताना ३४ कसोटीत ४३३ विकेट्स घेतल्या होत्या. मात्र ऑस्ट्रेलियाच्या या चौकडीने इंग्लंडच्या चौघांना खूप मागे टाकत नवा विक्रम प्रस्थापित केला.

गेले दीड दशक हे चौघे ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजी आक्रमणाची धुरा सांभाळत आहेत. कमिन्सने २०११ मध्ये कसोटी पदार्पण केलं. मात्र गंभीर अशा दुखापतीमुळे तो बाहेर फेकला गेला. प्रदीर्घ कालावधीनंतर त्याने पुनरागमन केलं. मात्र आताही वर्कलोड मॅनेजमेंट, दुखापती यामुळे कमिन्स ठराविक कसोटी सामने खेळतो. स्टार्कने टी२० प्रकाराला रामराम केला. कसोटीवर लक्ष केंद्रित करण्यासाठी त्याने बाकी अनेक स्पर्धांना बाजूला सारलं. त्यामुळे तो प्रदीर्घ काळ कसोटी खेळू शकला आहे. हेझलवूडलाही दुखापतींनी सातत्याने सतावलं आहे. त्यामुळे सलग कसोटी सामने खेळणं त्याला कठीण होतं. या चौघांमध्ये लॉयनने अद्भुत सातत्य राखत सलग कसोटी सामने खेळण्याचा विक्रम रचला.

ऑस्ट्रेलियासाठी कसोटी प्रकारात सर्वाधिक विकेट्स पटकावणाऱ्यांच्या यादीत लॉयन ५७३ विकेट्ससह दुसऱ्या स्थानी आहे. मिचेल स्टार्क ४४७ विकेट्ससह चौथ्या स्थानी आहे. ३२६ विकेट्ससह कमिन्स सहाव्या तर हेझलवूड ३०७ विकेट्ससह नवव्या स्थानी आहे.