भारत आणि दक्षिण आफ्रिकेदरम्यान सुरू असलेल्या पाच सामन्यांच्या मालिकेत भारताने २-२ अशी बरोबरी साधली आहे. सौराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर झालेल्या चौथ्या आंतरराष्ट्रीय टी २० सामन्यात भारताने दक्षिण आफ्रिकेचा ८२ धावांनी पराभव केला. भारताने दिलेल्या १७० धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेचा संघ १७ षटकांमध्येच गारद झाला. भारताच्या या विजयात वेगवान गोलंदाज आवेश खानने महत्त्वाची भूमिका निभावली. आपल्या कामगिरीच्या माध्यमातून त्याने आपल्या वडिलांना वाढदिवसाच्या अनोख्या शुभेच्छा दिल्या.

भारतीय संघातील अनेक वरिष्ठ खेळाडू उपलब्ध नसल्यामुळे आवेश खानची भारतीय संघात वर्णी लागली होती. पाच सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या तीन सामन्यांमध्ये त्याला संधी देण्यात आली होती. मात्र, त्याला अपेक्षेप्रमाणे खेळ करता आला नव्हता. आवेशने पहिल्या तीन सामन्यांत ११ षटके टाकून ८७ धावा दिल्या होत्या. या दरम्यान त्याला एकही बळी घेता आला नव्हता. त्यामुळे आजच्या (१७ जून) सामन्यात त्याला बाहेर ठेवले जाईल, अशी शक्यता होती. पण, कर्णधार ऋषभ पंत आणि प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी त्याच्यावर विश्वास दाखवत त्याला आणखी एक संधी दिली. आवेशने या संधीचा पुरेपुर फायदा घेत चमकदार कामगिरी केली.

हेही वाचा – IND vs SA 4th T20I : ‘करो या मरो’ लढतीत भारताने लाज राखली, सलग दुसरा सामना जिंकत मालिकेत साधली बरोबरी

राजकोट येथे झालेल्या सामन्यात आवेश खानेने चार षटकांमध्ये केवळ १८ धावा देऊन चार बळी मिळवले. आंतरराष्ट्रीय टी २० क्रिकेटमधील ही त्याची सर्वोत्तम कामगिरी ठरली. त्याने ड्वेन प्रिटोरिअस, व्हॅन डेर डुसेन, मार्को यान्सन आणि केशव महाराज यांना माघारी धाडत आफ्रिकन फलंदाजीचे कंबरडे मोडले.