भारताला ६७ वर्षांनंतर स्टीपलचेस शर्यतीत संधी

बीड :  जपानमधील टोक्यो शहरात २३ जुलैपासून होत असलेल्या ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेत आष्टीचा अविनाश साबळे हा सैन्य दलातील तरुण ३००० मीटर्स स्टिपलचेस प्रकारात भारताचे प्रतिनिधित्व करणार आहे. दुष्काळी भागातील सामान्य कुटुंबात जन्मलेला अविनाशमुळे ६७ वर्षांनी पुरुषांच्या स्टीपलचेस प्रकारात भारतीय अ‍ॅथलेटिक्सपटू सहभागी होणार आहे.

आष्टी तालुक्यातील मांडवा या पंधराशे लोकसंख्येच्या गावातील अविनाश साबळे याचे आई-वडील वीटभट्टीवर मजूर म्हणून काम करतात. अविनाशने आयुष्याच्या अडथळ्यांची शर्यत पार करत वयाच्या १८व्या वर्षी सैन्य दलात प्रवेश केला. जम्मू कश्मीरमध्ये कर्तव्यावर असताना सैन्य दलांतर्गत स्टिपलचेस या क्रीडा प्रकारात सहभाग नोंदवून सर्वांचेच लक्ष वेधले. प्रशिक्षक अमरिश कुमार यांनी अविनाशमधील गुणवत्ता ओळखून त्याला शास्त्रशुद्ध पध्दतीने प्रशिक्षण दिले. तीन वर्षांच्या प्रशिक्षणात तीन हजार मीटर स्टीपलचेस प्रकारात यश मिळवले. मागच्या वर्षी राष्ट्रीय स्पर्धेत आठ मिनिटात ८ मिनिट २९.८० सेकंदात तीन हजार मीटर स्टीपलचेस शर्यतीमध्ये राष्ट्रीय विक्रम नोंदवला, तर दोहा येथे झालेल्या स्पर्धेत पहिल्याच फेरीत ८ मिनिटे, २५.२३ सेकंदांचा विक्रम केला. जपानमधील टोक्यो शहरात २३ जुलै पासून सुरू होत असलेल्या स्पर्धेत अडथळ्यांची शर्यत या क्रीडा प्रकारात अविनाश भारताचे नेतृत्व करणार आहे. ऑलिम्पिक स्पर्धेत या क्रीडा प्रकारात १९५२नंतर तब्बल ६७ वर्षांंनी प्रतिनिधित्व करण्याची संधी भारताला मिळाली आहे.