भारताच्या अविनाश साबळेने एक नवा ‘महाविक्रम’ नोंदवला आहे. अमेरिकेतील सॅन जुआन कॅपिस्ट्रानो येथे झालेल्या साऊंड रनिंग ट्रॅक मीटमध्ये ५००० मीटरमध्ये बहादूर प्रसादचा ३० वर्ष जुना विक्रम त्याने मोडीत काढला आहे. या पराक्रमानंतर तो यूएसए येथे १५ ते २४ जुलै २०२२ दरम्यान होणार्‍या जागतिक अजिंक्यपद स्पर्धेसाठी पात्र ठरला आहे.

३० वर्ष जूना विक्रम मोडला

महाराष्ट्रातील बीड जिल्ह्यातील सैनिक कुटुंबातील असलेल्या अविनाशने आत्तापर्यंत अनेकदा आपलेच विक्रम मोडले आहेत. त्याने २०२१ च्या ऑलिम्पिकमध्ये स्वत:चाच विक्रम मोडला होता. १९९२ मध्ये बर्मिंगहॅम येथे बहादुर प्रसादने १३:२९.७० सेकंदांचा विक्रम केला होता. आज ३० वर्षानंतर अविनाशने तो विक्रम मोडीत काढला. १३:२५.६५ सेकंदात अवनिनाशने स्पर्धा पूर्ण करत नवा विक्रम रचला आहे. सध्या अविनाश आगामी आंतरराष्ट्रीय स्पर्धांसाठी यूएसएमध्ये प्रशिक्षण घेत आहे. त्याने टोक्यो ऑलिम्पिकमध्ये ८:१८.१२ सेकंदांचा तत्कालीन राष्ट्रीय विक्रमही केला होता.

साबळे हा स्वतःचा ३ हजार मीटर स्टीपलचेस राष्ट्रीय विक्रम अनेक वेळा मोडण्यासाठी ओळखला जातो. मार्चमध्ये तिरुअनंतपुरम येथे झालेल्या इंडियन ग्रांप्री २ दरम्यान त्याने सातव्यांदा स्वतःचा विक्रम मोडला होता.