नवी दिल्ली : भारताची युवा पॅरानेमबाज अवनी लेखराने फ्रान्स येथे सुरू असलेल्या जागतिक पॅरा क्रीडा विश्वचषक नेमबाजी स्पर्धेत सलग दुसऱ्या सुवर्णपदकाची कमाई केली. अवनीने महिलांच्या आर८ गटातील ५० मीटर रायफल थ्री-पोझिशन एसएच१ गटात सुवर्ण कामगिरी केली.

अवनीने ४५८.३ गुणांची कमाई करत सुवर्णपदक पटकावले. तर व्हेरॉनिका व्हादोव्हिकोव्हा (४५६.६ गुण) आणि स्वीडनची अ‍ॅना नॉर्मन (४४१.९ गुण) या अनुक्रमे रौप्य व कांस्यपदक मिळवण्यात यशस्वी ठरल्या.

राजस्थानच्या अवनीला अंतिम फेरीच्या सुरुवातीला अपेक्षित खेळ करता आला नाही. मात्र, अखेरच्या तीन फेऱ्यांमध्ये सलग १० गुणांवर लक्ष्य साधत त्याने विजय साकारला. लेखराने यापूर्वी महिलांच्या आर२ गटातील १० मीटर एअर रायफल एसएच१ प्रकारात सुवर्णपदक मिळवले होते.

दुसरीकडे, भारताची युवा पॅरानेमबाज रुबीना फ्रान्सिसने  महिलांच्या पी२ गटातील १० मीटर एअर पिस्तूल एसएच१ प्रकारात  कांस्यपदक पटकावले.