आयपीएल स्पर्धेत मंगळवारी घरच्या मैदानावर हैदराबादने दिल्ली कॅपिटल्सवर ४७ धावांनी विजय मिळवला. फलंदाजीसाठी अतिशय पोषक अशा खेळपट्टीवर हैदराबादने २४२ धावांचा डोंगर उभारला. प्रत्युत्तरादाखल खेळताना दिल्लीने १९५ धावांची मजल मारली. हैदराबादच्या विजयापेक्षा दिल्लीने आखलेल्या डावपेचाची चर्चा जास्त रंगली. दिल्लीने या लढतीत टॉस जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतला. साहजिकच सहा गोलंदाजांनिशी खेळून, पहिल्या डावानंतर त्या गोलंदाजाऐवजी इम्पॅक्ट प्लेयर म्हणून फलंदाजाला समाविष्ट करता आलं असतं. दिल्ली संघाने गोलंदाजी करणार असूनही आकिब नबीला वगळण्याचा निर्णय घेतला. जम्मू काश्मीरच्या आकिबने यंदाच्या रणजी करंडक स्पर्धेत सर्वाधिक विकेट्स पटकावल्या होत्या. काही दिवसांपूर्वीच त्याने आयपीएल पदार्पण केलं होतं. दिल्लीने नबीऐवजी गोलंदाजी करू शकणारा फलंदाज नितीश राणाला पसंती दिली. सुरुवातीच्या काही सामन्यांनंतर राणाला अंतिम अकरातून वगळण्यात आलं होतं.

दिल्लीचा कर्णधार अक्षर पटेल स्वत: उत्तम फिरकीपटू आहे. दिल्लीकडे कुलदीप यादवच्या रुपात आणखी एक फिरकीपटू आहे. मात्र हैदराबादची सलामीची जोडी अभिषेक शर्मा आणि ट्रॅव्हिस हेड हे दोघेही डावखुरे आहेत. डावखुरे फिरकीपटू डावखुऱ्या फलंदाजांविरुद्ध चांगली कामगिरी करत नाहीत. तांत्रिकदृष्ट्याही डावखुऱ्या फलंदाजांना डावखुऱ्या फिरकीपटूंना खेळणं सोपं जातं त्यामुळे ते सहजतेने धावा चोपतात असं डेटा सांगतो. त्यामुळे दिल्लीचा कर्णधार अक्षर पटेलने स्वत: किंवा कुलदीप याच्याऐवजी नितीश राणाला गोलंदाजी देण्याचा निर्णय घेतला.

नितीशने आयपीएल स्पर्धेत ५ डावखुऱ्या फलंदाजांना बाद केलं आहे. मात्र ही एकूण आकडेवारी आहे. नितीश सध्या अंतिम अकरातही नाहीये. नियमितपणे गोलंदाजी करण्याचा विषयच नाही. तरीरी नितीशला ऐन भरात असलेल्या अभिषेक आणि ट्रॅव्हिस यांच्यासमोर गोलंदाजी देण्यात आली. डावातलं दुसरंच षटक राणाने टाकलं. यामध्ये अभिषेक-हेडने सावध पवित्रा घेत सहाच धावा काढल्या. राणाचं पहिलं षटक शांततेत गेल्यामुळे अक्षरने दुसरं षटक देण्याचा निर्णय घेतला. मात्र या षटकात अभिषेक-हेडने २० धावा वसूल केल्या. यामध्ये ३ खणखणीत षटकारांचा समावेश होता. पॉवरप्ले संपल्यानंतर पुन्हा राणाला गोलंदाजी देण्यात आली. या षटकात राणाने केवळ ६ धावा दिल्या. मात्र राणाच्या शेवटच्या षटकात २३ धावा कुटल्या गेल्या. यामध्ये ३ षटकार आणि एका चौकाराचा समावेश होता. राणाचं सामन्यातलं पृथक्करण होतं ४-०-५५-०.

हैदराबादने फलंदाजीला पोषक खेळपट्टीचा फायदा उठवत २४२ धावांचा डोंगर उभारला. अभिषेकने १० चौकार आणि १० षटकारांसह नाबाद १३५ धावांची खेळी केली. ट्रॅव्हिस हेड आणि हेनरिच क्लासन यांनी प्रत्येकी ३७ धावा केल्या. दिल्लीच्या सर्वच गोलंदाजांना अभिषेकसह बाकी फलंदाजांच्या बॅटचा तडाखा बसला. अनुभवी आणि नियमित गोलंदाज असूनही अक्षरने केवळ दोन षटकं टाकली. त्याने २ षटकात २३ धावा देत एक विकेट पटकावली होती. कुलदीपने २ षटकं टाकली. स्वैर गोलंदाजीमुळे त्याच्या दोन षटकात ३० धावा चोपल्या गेल्या. मॅचअप्सच्या आग्रहापोटी ऑफब्रेक गोलंदाजी करणाऱ्या राणाला पूर्ण ४ षटकं देण्यात आली. राणा दशकभराहून अधिक काळ आयपीएल खेळतो आहे. मात्र या काळात त्याने १० विकेट्स घेतल्या आहेत. त्याने इतक्या वर्षात फक्त ३६ षटकं टाकली आहेत. आकडेवारीनुसार तो कामचलाऊ गोलंदाज आहे. मात्र तरीही अभिषेकसारख्या फॉर्मात असलेल्या फलंदाजासमोर पॉवरप्लेमध्ये त्याला गोलंदाजी देण्यात आली.

राणाने फलंदाजी करताना ३० चेंडूत ७ चौकार आणि ३ षटकारांसह ५७ धावांची खेळी केली. राणाने त्याचं मुख्य काम विसरलो नसल्याचं दाखवून दिलं. दिल्लीकडे विपराज निगमसारखा फिरकीपटू होता. तो नियमित गोलंदाजी करतो. त्याला खेळवता आलं असतं. दिल्लीचा कर्णधार अक्षर आणि संघव्यवस्थापनाच्या निर्णयावर माजी खेळाडूंनी टीका केली आहे. ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार आरोन फिंचने म्हटलं आहे की अक्षरने स्वत:हून ही जबाबदारी घ्यायला हवी होती. तो अनुभवी खेळाडू आहे. वर्ल्डकपविजेत्या संघाचा अविभाज्य घटक होता. जो खेळाडू अनेक सामने खेळलेला नाही, जो नियमित गोलंदाजी करत नाही त्याला ४ षटकं गोलंदाजी देण्यात काहीच हशील नाही. मॅचअप्स वगैरे समजू शकतो पण चांगला हुशार गोलंदाज फलंदाजाला बाद करण्यासाठी क्लृप्ती शोधून काढतो.

दक्षिण आफ्रिकेचा माजी कर्णधार आणि आयपीएलचा प्रदीर्घ अनुभव असलेल्या फाफ डू प्लेसिसनेही दिल्लीचे डावपेच अनाकलनीय असल्याचं म्हटलं. अक्षर आणि कुलदीप हे अतिशय कुशाग्र पद्धतीने फिरकीपटू आहेत. अभिषेक फॉर्मात आहे. हेड-क्लासनही फॉर्मात आहेत. त्यांना बाद कसं करायचं याचा अभ्यास त्यांनी नक्कीच केला असणार.

आयपीएल स्पर्धेत सध्या मॅचअप्सचं प्रस्थ वाढलं आहे. उदाहरणार्थ रशीद खान आणि संदीप शर्मा हे दोघं विराट कोहलीला बाद करतात असं डेटा सांगतो. त्यामुळे कोहली फलंदाजीला असताना या दोघांना गोलंदाजी दिली जाते. डावखुरा फलंदाज खेळत असेल तर डावखुऱ्या गोलंदाजाला गोलंदाजी दिली जात नाही. त्यावेळी ऑफस्पिनरला गोलंदाजी दिली जाते. तडाखेबंद फलंदाजीसाठी प्रसिद्ध रोव्हमन पॉवेल चांगल्या फिरकीचा सामना करता येत नाही. हे डेटाद्वारे सिद्ध झाल्याने पॉवेल फलंदाजीला आल्यावर लेगस्पिनरला गोलंदाजी दिली जाते.

काही खेळाडू विशिष्ट फटका खेळताना बाद होतात. उदाहरणार्थ काही खेळाडूंना उसळत्या चेंडूचा सामना करताना अडचण येते. असा फलंदाज मैदानात आल्यावर उसळत्या चेंडूंचा मारा केला जातो. काही खेळाडूंना स्वीपचा फटका मारायला आवडतो. अचूक टप्प्यावर चेंडू टाकून स्वीप करताना एलबीडब्ल्यू करण्यासाठी सापळा रचला जातो.

शिवम दुबे फिरकीपटूंच्या गोलंदाजीवर जोरदार आक्रमण करतो. त्यामुळे दुबे खेळत असेल तर फिरकीपटूंना गोलंदाजी देणं टाळलं जातं. मुंबईचा संघ विल जॅक्स या ऑफस्पिनरचा खुबीने वापर करतं. ऑफस्पिनरचा चेंडू डावखुऱ्या फलंदाजांपासून दूर जातो. यामुळे त्यांना हवेत फटका मारणे कठीण जातं. त्यामुळे ज्या संघात डावखुरे फलंदाज जास्त असतात त्यावेळी प्रतिस्पर्धी संघाकडून ऑफस्पिनरला गोलंदाजी दिली जाते.

आयपीएल स्पर्धेत इम्पॅक्ट प्लेयर नियम लागू आहे. प्रत्येक संघाला सामन्यात कोणत्याही क्षणी अतिरिक्त फलंदाज किंवा अतिरिक्त गोलंदाज खेळवता येतो. प्रथम गोलंदाजी करायचा निर्णय झाला तर पहिला डाव संपल्यानंतर एका गोलंदाजाला वगळून फलंदाजाला घेतलं जातं. त्याच धर्तीवर फलंदाजीचा निर्णय झाला असेल तर फलंदाजी झाल्यावर विशेषज्ञ फलंदाजाला वगळून त्याच्या जागी गोलंदाजाला सामील केलं जातं. थोडक्यात सांगायचं तर प्रत्येक संघाला १२ खेळाडूंनिशी खेळता येतं. इम्पॅक्ट प्लेयरला कधी समाविष्ट करायचं आणि कोणाला करायचं याचा निर्णय संघव्यवस्थापन घेतं. मंगळवारी झालेल्या लढतीत

मॅचअप्स म्हणजे काय?

मॅचअप्स म्हणजे एखाद्या विशिष्ट फलंदाजाची किंवा गोलंदाजाची विशिष्ट संघाविरुद्ध किंवा फलंदाज-गोलंदाजाविरूद्धची कामगिरी. सोप्या शब्दात सांगायचं तर एखाद्या फलंदाजाचे कच्चे दुवे काय आहेत किंवा एखाद्या गोलंदाजाचं बलस्थान काय आहे हे ओळखून डावपेच आखणे. एखादा फलंदाज प्रामुख्याने लेगसाईडला फटकेबाजी करत असेल तर त्यानुसार क्षेत्ररक्षणाची सजावट केली जाते. एखादा फलंदाज स्वीपचा फटका सातत्याने खेळतो हे डेटातून स्पष्ट होत असेल तर या फटक्यावरच त्याला बाद करण्यासाठी आखणी केली जाते.

मुंबई इंडियन्सकडे जसप्रीत बुमराहसारखं हुकूमी अस्त्र आहे. मुंबईचा कर्णधार हार्दिक पंड्या बुमराहचा वापर एखाद्या ट्रम्पकार्डसारखा करतो. बुमराहची अ‍ॅक्शन आणि अचूकता खेळपट्टीवर नव्या आलेल्या फलंदाजांसाठी अवघड ठरते. म्हणूनच नवा फलंदाज खेळपट्टीवर आल्यानंतर हार्दिक बुमराहला गोलंदाजी देतो. बुमराह बहुतांशवेळा त्या फलंदाजाला बाद करत मोहीम फत्ते करतो.

पंजाबचा अनुभवी अष्टपैलू खेळाडू ग्लेन मॅक्सवेल कोलकाताच्या वरुण चक्रवर्तीची फिरकी खेळू शकत नाही. वरुणच्या पोतडीतील विविध अस्त्रं मॅक्सवेलच्या पचनी पडत नाहीत. त्यामुळे कोलकाता-पंजाब लढतीत मॅक्सवेल फलंदाजीला आला की कोलकाताचा कर्णधार तातडीने वरुणला गोलंदाजीस पाचारण करतो. वरुण मॅक्सवेलला माघारी धाडत कर्णधार आणि संघव्यवस्थापनाचा विश्वास सार्थ ठरवतो.

चेन्नईच्या चेपॉक स्टेडियमची खेळपट्टी संथ आणि धीमी आहे. या खेळपट्टीवर खोऱ्याने धावा होत नाहीत हे लक्षात घेऊन चेन्नईचा संघ फिरकीबहुल आक्रमणावर भर देतं. पॉवरप्लेच्या षटकापासून म्हणजे ६ आणि हाणामारीच्या षटकांच्या सुरुवातीपर्यंत म्हणजे १६ पर्यंत या षटकांमध्ये अधिकाअधिक फिरकी गोलंदाज गोलंदाजी करतात आणि प्रतिस्पर्धी फलंदाजांना जखडून ठेवतात.

मॅचअप्ससाठी काय उपयोगी पडतं?

आयपीएल संघांच्या ताफ्यात विविध प्रकारचे प्रशिक्षक असतात. यामध्ये व्हीडिओ अ‍ॅनालिस्टचाही समावेश असतो. फलंदाज कुठल्या पद्धतीचे फटके खेळतो, मैदानाच्या कुठल्या भागात फटके मारतो, कुठला फटका मारताना तो बाद होतो, कुठल्या गोलंदाजांसमोर तो निरुत्तर ठरतो, बाद होण्यात काही साम्यस्थळं आहेत का हा सगळा डेटा व्हीडिओसकट उपलब्ध असतो. गोलंदाज असेल तर कुठल्या टप्प्यावर गोलंदाजी केली आहे, पॉवरप्लेमध्ये गोलंदाजी कशी आहे, कुठल्या फलंदाजाला जाळ्यात अडकवलं आहे, कुठल्या फलंदाजाची धास्ती आहे, छोट्या मैदानात गोलंदाजी कशी आहे, दव पडलेलं असताना गोलंदाजी कशी आहे, नवा चेंडू हाताळताना गोलंदाजी कशी आहे असे सगळे तपशील उपलब्ध असतात. या तपशीलांमधून अन्यवार्थ शोधून त्यानुसार डावपेच-योजना आखल्या जातात.