Axar Patel Statement: जयपूरच्या सवाई मानसिंग स्टेडियमवर दिल्ली कॅपिटल्स संघाने इतिहास घडवला. दिल्लीने आयपीएल स्पर्धेत आतपर्यंतच्या सर्वात मोठ्या आव्हानाचा यशस्वी पाठलाग केला आहे. राजस्थान रॉयल्स संघाने या सामन्यातील पहिल्या डावात फलंदाजी करताना २० षटकांअखेर ६ गडी बाद २२५ धावा केल्या होत्या. या धावांचा पाठलाग करताना दिल्लीकडून केएल राहुल आणि पथूम निसांका यांनी दमदार सुरुवात करून दिली. दिल्लीने हा सामना ७ गडी राखून आपल्या नावावर केला आणि आतपर्यंतचा सर्वात मोठ्या आव्हानाचा यशस्वी पाठलाग केला. हा ऐतिहासक विजय दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार अक्षर पटेलने अपघातात मरण पावलेल्या दिल्ली कॅरियल्सच्या क्रिकेट चाहत्यांना समर्पित केला आहे.
दिल्ली कॅपिटल्स संघाचा याआधीचा सामना पाहण्यासाठी आलेल्या चाहत्यांपैकी २ क्रिकेट चाहत्यांचा सामना पाहून घरी जात असताना अपघात झाला. या अपघातात दोघांनाही आपले प्राण गमवावे लागले. दरम्यान या विजयानंतर अक्षर पटेलने त्यांना श्रद्धांजली वाहिली असून, हा विजय दोघांना समर्पित केला आहे.
सामना झाल्यानंतर बोलताना अक्षर पटेल म्हणाला, “गेल्या सामन्यानंतर आमच्या चाहत्यांसोबत जी दुःखद घटना घडली, त्याबद्दल मला इतकंच सांगायचं आहे की, आम्ही तुमच्या दुःखात सहभागी आहोत. हा विजय आम्ही त्यांना समर्पित करतो. आमच्या दिल्ली कॅपिटल्स कुटुंबाशी जोडलेले २ सदस्य आम्ही गमावले आहेत.”
या सामन्यात राजस्थान रॉयल्स संघाचा कर्णधार रियान परागने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पण वैभव सूर्यवंशी आणि यशस्वी जैस्वाल ही जोडी स्वस्तात माघारी परतली. त्यानंतर संपूर्ण जबाबदारी ध्रुव जुरेल आणि कर्णधार रियान परागवर होती. दोघांनी मिळून दिल्लीचा डाव सांभाळला. रियान परागने ९० तर ध्रुव जुरेलने ४२ धावांची खेळी केली. या खेळीच्या बळावर राजस्थान रॉयल्सने २२५ धावा केल्या.
दिल्ली कॅपिटल्स संघाला हा सामना जिंकण्यासाठी २२६ धावा करायच्या होत्या. या आव्हानाचा पाठलाग करताना केएल राहुलने सर्वाधिक ७५ धावांची खेळी केली. तर पथूम निसांकाने ६२ आणि नितीश राणाने ३३ धावांची खेळी केली. या खेळीच्या बळावर दिल्लीने हा सामना ७ गडी राखून आपल्या नावावर केला.
