India Coach Statement on Axar Patel Dropped: दक्षिण आफ्रिकेविरूद्ध सुपर-८ सामन्यात संघाचा उपकर्णधार अक्षर पटेलला संघाबाहेर ठेवण्याच्या निर्णयाने सर्वांच्या भुवया उंचावल्या. जवळपास आपल्या घरच्या मैदानावर खेळत असलेल्या सामन्यात अष्टपैलू मॅचविनर खेळाडूला बाहेर बसवणं हा निर्णय टीम इंडियाला चांगलाच महागात पडला. भारताची फलंदाजी फळी फेल ठरली आणि परिणामी संघाला ७६ धावांनी मोठा पराभव पत्करावा लागला. टी-२० विश्वचषकाच्या इतिहासातील धावांच्या फरकाने झालेला हा भारताचा सर्वात मोठा पराभव ठरला.

अक्षर पटेलच्या जागी सामन्यात वॉशिंग्टन सुंदरला खेळवण्यात आलं, जो विश्वचषकापूर्वी दुखापतीमुळे संघाबाहेर होता. नेदरलँड्सविरूद्ध बऱ्याच कालावधीनंतर तो पहिला सामना खेळत होता. त्यामुळे हा सामना त्याच्यासाठी दुसराच सामना होता. या सामन्यात सुंदरने ११ चेंडूत ११ धावा केल्या. तर गोलंदाजीत २ षटकांत एकही विकेट न देता १७ धावा दिल्या. अक्षर पटेलने अशाच कठीण स्थितीत टी-२० वर्ल्डकप २०२४ मध्ये ४७ धावांची महत्त्वपूर्ण खेळी करत संघाच्या विजयी धावसंख्येचा पाया रचला होता. पण या सामन्यात त्याला बाहेर बसवून चूक झाल्याचं सहाय्यक प्रशिक्षकांनीही मान्य केलं.

अक्षर पटेलला संघातून वगळण्याचा निर्णय चुकीचा – कोचचं मोठं वक्तव्य

भारताचे सहाय्यक प्रशिक्षक रायन टेन डेश्काटे यांनीही सामन्यानंतर मान्य केलं की, नंतर विचार करता अक्षरला बाहेर ठेवण्याचा निर्णय चुकीचा वाटतो. “आम्ही संघरचना ठरवताना खूप चर्चा केली. सामना कोणत्या ‘मॅच-अप्स’वर जाईल याचा विचार केला. पण आता मागे वळून पाहिल्यावर तो निर्णय चुकीचा वाटतो. अक्षरबद्दल काहीही कमी लेखायचं नाही. आम्ही निराश आहोत. कुणीही तुम्हाला विश्वचषक सहज देणार नाही. एक चूक परवडू शकते. मात्र खेळाडू जोरदार पुनरागमन करू शकतात. पुढे दोन मोठे सामने आहेत,” असं त्यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं.

याआधी नाणेफेकीवेळी कर्णधार सूर्यकुमार यादवने नेदरलँड्सविरुद्ध खेळलेल्या संघासह या सामन्यात उतरत असल्याचं सांगितलं होतं. अक्षर पटेलऐवजी वॉशिंग्टन सुंदरला संधी देण्यामागे हा केवळ डावपेचात्मक निर्णय असल्याचही त्याने स्पष्ट केलं. “अक्षरबाबत हा निर्णय कठोर आहे, पण आम्ही त्याच संघासोबत खेळत आहोत. हा फक्त टॅक्टिकल निर्णय आहे,” असं कर्णधार म्हणाला. मात्र हा निर्णय उलटला. सुंदरने फलंदाजीत फक्त ११ धावा केल्या आणि गोलंदाजीत दोन षटकांत एकही विकेट मिळवू शकला नाही.

सामन्यात डेव्हिड मिलरने जुना आक्रमक अंदाज दाखवत दमदार अर्धशतक झळकावलं, तर दक्षिण आफ्रिकेने गोलंदाजीत अचूक मारा करत भारताला कोंडीत पकडलं आणि पहिल्या गटातील सुपर-८ सामन्यात ७६ धावांनी शानदार विजय मिळवला. प्रथम फलंदाजी करताना दक्षिण आफ्रिकेने मिलरच्या ३५ चेंडूत ६३ धावा आणि डेवाल्ड ब्रेविसच्या २९ चेंडूत ४५ धावांच्या खेळीच्या बळावर ५१ चेंडूत ९७ धावांची चौथ्या विकेटसाठी भागीदारी उभारली आणि ७ बाद १८७ अशी भक्कम धावसंख्या उभी केली.

प्रत्युत्तरात भारताची फलंदाजी पूर्णपणे ढासळली. एडन मारक्रमच्या नेतृत्वाखालील दक्षिण आफ्रिकन संघाने अचूक गोलंदाजी करत भारताला १८.५ षटकांत अवघ्या १११ धावांवर गुंडाळलं. मार्को यान्सने ४ विकेट्स तर केशव महाराजने ३ आणि कॉर्बिन बॉशने २ असे महत्त्वाचे विकेट्स घेत भारताचा डाव उधळून लावला.