Axar Patel statement after POTM Award: अक्षर पटेलने भारताच्या वनडे मालिकेतील पहिल्या सामन्यात अष्टपैलू कामगिरीच्या बळावर महत्त्वाची भूमिका बजावली. अक्षर पटेलने गोलंदाजीत ४ महत्त्वाच्या विकेट्स घेत फलंदाजीत अर्धशतकी खेळी करत संघाच्या विजयाचा हिरो ठरला. शुबमन गिल, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर व श्रेयस अय्यर यांच्या कामगिरीच्या बळावर टीम इंडियाने पहिल्या वनडे सामन्यात ६ विकेट्स सोपा विजय मिळवला, यासह तीन सामन्यांच्या वनडे मालिकेत टीम इंडियाने १-० अशी आघाडी घेतली. मॅचविनिंग कामगिरीनंतर अक्षर पटेल काय म्हणाला, जाणून घेऊया.
भारताच्या चांगल्या सुरूवातीनंतरही जो रूट व लियाम डॉसन यांनी इंग्लंचा डाव सावरत १२१ धावांची भागीदारी रचली होती. अक्षर पटेलने ही भागीदारी तोडत टीम इंडियाला मोठा दिलासा दिला. यानंतर उर्वरित तीन फलंदाजांना बाद करत अक्षरने इंग्लंडचा डाव गुंडाळला. अक्षरने ९.५ षटकांत ६२ धावा देत ४ विकेट्स घेतल्या. यानंतर फलंदाजीत शुबमन गिल रिटायर्ड हर्ट झाल्यानंतर श्रेयस अय्यर व केएल राहुलही झेलबाद झाले. त्यांच्या विकेटस गेल्यानंतर अक्षर पटेलने बिनधास्त व आक्रमक फलंदाजी करत वॉशिंग्टनच्या साथीने भारताचा डाव सावरला.
सामनावीर पुरस्कार मिळाल्यानंतर अक्षर पटेल काय म्हणाला?
अक्षर पटेलच्या या अष्टपैलू कामगिरीच्या बळावर त्याला सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला. सामनावीर पुरस्कार घेतल्यानंतर अक्षर पटेल म्हणाला, “टी-२० मालिकेचा निकाल पाहता, त्यानंतर आमच्यासाठी ही वनडे मालिका अशा विजयाने सुरू होणं अत्यंत महत्त्वाचं होतं. संघाने दमदार सुरुवात केली आणि माझीही आजची कामगिरी चांगली झाली, याचा मला आनंद आहे.”
गोलंदाजीबद्दल अक्षर म्हणाला, “मी एका ठराविक भागात चेंडू टाकण्याचा प्रयत्न केला. वेगात बदल करत स्टंप-टू-स्टंप मारा करण्यावर माझा भर होता आणि मी नेमकं तेच केलं. त्यामुळेच मला चार विकेट्स मिळाल्या असाव्यात.” धावांचा पाठलाग करताना भारताच्या रणनीतीबद्दल अक्षरने सांगितलं, “आमची सुरूवात चांगली झाली होती. त्यानंतर आम्हाला माहिती होतं की सामना आमच्या नियंत्रणात आहे. त्यामुळे फक्त स्ट्राइक फिरवत भागीदारी टिकवायची आणि सामना शांतपणे संपवायचा, एवढाच आमचा विचार होता.”
वॉशिंग्टन सुंदरबरोबर केलेल्या भागीदारीदरम्यान दोघांमध्ये काय चर्चा झाली, यावर अक्षर म्हणाला, “मी फलंदाजीला आलो तेव्हा वॉशिंग्टन सुंदर मैदानात होता. त्यावेळी आम्ही नुकत्याच काही विकेट्स गमावल्या होत्या, त्यामुळे आधी चांगली भागीदारी उभी करणं गरजेचं होतं. पुढची चार-पाच षटकं टिकून खेळायचं आणि त्यानंतर परिस्थितीनुसार निर्णय घ्यायचा, असं आम्ही ठरवलं. कारण सुरुवातीमुळे आम्ही सामन्यात आघाडीवर होतो. त्यामुळे भागीदारी उभी करून सामना पूर्ण करणं हेच आमचं लक्ष्य होतं.” भारताचा आता पुढचा वनडे सामना १६ जुलैला होणार आहे.
