पीटीआय, कोलंबो – पाकिस्तानविरुद्धचा सामना दडपणाचा अधिक असतो. अन्य कुठल्याही सामन्यापेक्षा या सामन्यातील दडपण वेगळे आणि त्याची तीव्रता अधिक असते. त्यामुळेच लढतीबद्दल मैदानाबाहेर होणार्‍या चर्चेपासून शक्य तेवढे दूर राहण्याचा प्रयत्न करणे हीच आमची मुख्य रणनीती होती, असे भारताचा अष्टपैलू अक्षर पटेल याने सांगितले.

पाकिस्तानविरुद्धच्या विजयानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत भारताकडून अक्षर सामोरा गेला होता. ‘‘पाकिस्तानविरुद्धच्या सामन्याचे दडपण वेगळे असते. यावेळी या दडपणाची तीव्रता अधिक असते. आजूबाजूचे लोक, मित्र अगदी कुटुंबीय याबद्दल सातत्याने विचारणा करत असतात. त्यामुळे या सामन्यापूर्वी अशा चर्चांपासून दूर राहणेच आम्ही पसंत करतो,’’ असे अक्षर म्हणाला.

‘‘विश्वचषकासारख्या स्पर्धेत खेळत असताना आम्ही व्यावसायिक क्रिकेटपटू आहोत ही खूणगाठ मनाशी बांधून घेतो. खेळावर लक्ष केंद्रित करताना भावनांवर नियंत्रण ठेवण्याकडे आमचे अधिक लक्ष असते. प्रतिस्पध्र्यांचा विचार करत नाही. त्यामुळे सहाजिकच आमच्यावर अतिरिक्त दबाब येण्याचा प्रश्न राहात नाही,’’ असेही अक्षरने सांगितले.

भारताची फलंदाजी किंवा पाकिस्तानची फिरकी ही सगळी बाहेरची चर्चा आहे. आमचे त्याकडे लक्ष नसते. आम्ही फक्त योजना कशी अमलात आणता येईल याचा विचार करतो. प्रथम किंवा नंतर फलंदाजी काय किंवा गोलंदाजी करतो तेव्हा आम्हाला काय करावे लागेल या एकमात्र गोष्टीचा विचार आमच्या मनाला शिवतो, असेही अक्षर म्हणाला.

अक्षरकडून इशानचे कौतुक

‘‘खेळपट्टीवर चेंडू फिरत होते. काही चेंडू अचानक उसळी घेत होते. त्यामुळे फलंदाजी करणे सोपे नव्हते. अशा आव्हानात्मक खेळपट्टीवर इशानने एक उत्तम खेळी केली,’’ असे अक्षरने इशान किशनच्या खेळीचे कौतुक केले. ‘‘जेव्हा तुमच्याकडे आत्मविश्वास असतो, तेव्हा खेळपट्टीबाबत तुम्ही विचार करत नाही. आत्मविश्वासाला तुमच्या कौशल्याची जोड मिळाली की इशानसारखी सर्वोत्तम खेळी आकाराला येते. इशानने मैदानाचा चांगला वापर केला. फलंदाजी करताना त्याचे चेंडूबरोबरच मैदानावरील क्षेत्ररक्षणाच्या व्यूहरचनेकडेही चांगले लक्ष होते. त्यामुळेच त्याने मैदानार जागा हेरून सर्वत्र फटके मारले. आजच्या विजयाचे श्रेय सर्वार्थाने त्यालाच जाते,’’ असेही अक्षरने सांगितले.

अष्टपैलू खेळाडूचे काम म्हणजे तुम्ही संघाला गरज असेल तेव्हा तुमचे योगदान देणे. यासाठी मला योग्य समजले जाते म्हणजे संघ व्यवस्थापनाचा माझ्यावर विश्वास आहे. त्यामुळे अष्टपैलू म्हणून जबाबदारी दिल्यावर परिस्थितीनुसार खेळ करून संघासाठी उपयुक्त कामगिरी करणे मी महत्त्वाचे मानतो. –अक्षर पटेल, भारताचा अष्टपैलू.