Axar Patel Statement: आयपीएल २०२६ स्पर्धेतील ५५ वा सामना पंजाब किंग्स आणि दिल्ली कॅपिटल्स या दोन्ही संघांमध्ये पार पडला. मोहालीच्या मैदानावर पार पडलेल्या या सामन्यात पंजाबने पहिल्या डावात फलंदाजी करताना २१० धावा केल्या होत्या. या धावांचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या दिल्ली कॅपिटल्सकडून आधी अक्षर पटेलने दमदार अर्धशतकी खेळी केली. त्यानंतर शेवटी डेव्हिड मिलरने दमदार अर्धशतक झळकावलं, माधव तिवारीने नाबाद १८ धावांची खेळी करून दिल्लीला विजय मिळवून दिला. दिल्लीने हा सामना ३ गडी राखून आपल्या नावावर केला. दरम्यान या विजयानंतर बोलताना अक्षर पटेल काय म्हणाला? जाणून घ्या.
या सामन्यातील टर्निंग पॉईंट कोणता? असा प्रश्न विचारला असता अक्षर पटेल म्हणाला, “मला वाटतं सुरुवातीच्या ३-४ षटकात गोलंदाजी करताना आम्ही ६० धावा खर्च केल्या होत्या. पण त्यानंतर मधल्या षटकांमध्ये मुकेश कुमार आणि माधव तिवारी यांनी ज्या पद्धतीने गोलंदाजी केली, त्यांनी मला राजस्थान रॉयल्सविरूद्धच्या सामन्याची आठवण करुन दिली. हाच या सामन्यातील खास क्षण ठरला. त्यानंतर फलंदाजी करत असताना माझ्या आणि डेव्हिड मिलरच्या खेळीमुळे डाव स्थिरावला. त्यानंतर शेवटी फलंदाजी करताना आशुतोष शर्मा आणि माधव यांसारख्या युवा खेळाडूंनी अतिशय सुंदर शेवट केला.”
तसेच तो पुढे म्हणाला की, “मी मागच्या काही सामन्यांपासून एकच गोष्ट सांगतोय. ती म्हणजे, महत्वाच्या क्षणी आम्ही चांगली कामगिरी करण्यात अपयशी ठरत होतो. जेव्हा जेव्हा सामना निर्णायक टप्प्यावर येत होता, तेव्हा निकाल आमच्या विरोधात जात होता. तरीही मी हेच सांगत होतो, की हा उत्तम संघ आहे, आम्ही चांगलं क्रिकेट खेळत आहोत. प्रत्येक दिवस वेगळा असतो. त्यामुळे आम्ही आज ज्या पद्धतीने खेळ केला, ते पाहता मला तर खूप आनंद झाला आहे.”
मोहालीच्या मैदानावर पार पडलेल्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या पंजाब किंग्सने २० षटकांअखेर २१० धावा केल्या. पंजाबकडून कर्णधार श्रेयस अय्यरने नाबाद ५९ धावांची खेळी केली. या धावांचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या दिल्ली कॅपिटल्सकडून आधी अक्षर पटेलने ५६ धावांची खेळी केली. त्यानंतर डेव्हिड मिलरने ५१ धावा केल्या. शेवटी आशुतोष शर्माने २४, माधव तिवारीने १८ आणि आकिब नबीने १० धावा करून दिल्लीला ३ गडी राखून विजय मिळवून दिला.
