Axar Patel on DC Defeat Taunts Kuldeep Yadav: आयपीएल २०२६ मध्ये दिल्ली कॅपिटल्ससाठी परिस्थिती दिवसेंदिवस कठीण होत चालली आहे. चेन्नई सुपर किंग्सविरूद्धच्या सामन्यात अक्षर पटेलच्या दिल्ली कॅपिटल्स संघाला पराभव पत्करावा लागला. या पराभवामुळे आता प्लेऑफसाठीचा संघाचा मार्ग खडतर होताना दिसत आहे. दिल्लीच्या पराभवानंतर अक्षर पटेलने संघातील गोड बोलत कुलदीप यादवला टोमणा मारला. कर्णधार सामन्यानंतर नेमकं काय म्हणाला, जाणून घेऊया.
प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतल्यानंतर दिल्लीची फलंदाजी फळी पूर्णपणे अपयशी ठरली. त्यांनी २० षटकांत केवळ ७ बाद १५५ धावा केल्या आणि हेच त्यांच्या पराभवाची मुख्य कारण ठरलं. ६९ धावांवर पहिल्या पाच विकेट्स गमावल्यानंतर ट्रिस्टन स्टब्स आणि समीर रिझवी यांनी सहाव्या विकेटसाठी ६५ धावांची भागीदारी करत संघाला १५० च्या पुढे नेलं. मात्र ही धावसंख्या अपुरी ठरली, कारण संजू सॅमसनच्या उत्कृष्ट फलंदाजीमुळे चेन्नईने सहज लक्ष्य गाठलं आणि प्लेऑफमध्ये जाण्याच्या आशा जिवंत ठेवल्या.
दिल्लीच्या पराभवानंतर कर्णधार अक्षर काय म्हणाला?
सामन्यानंतर अक्षर पटेलने स्पष्टपणे सांगितलं की, या पराभवाचं मुख्य कारण म्हणजे संघाची खराब फलंदाजी होय. “पहिल्या डावात खेळपट्टी ज्याप्रकारची होती, त्यानुसार १५५ धावा चांगल्या वाटत होत्या. आम्ही आठ फलंदाजांसह खेळत आहोत, त्यामुळे मला वाटतं आम्ही किमान १०-१५ धावा कमी केल्या,” असं कर्णधार म्हणाला.
“दुसऱ्या डावात खेळपट्टी थोडी सुधारली असं वाटलं, पण आमच्याकडे एकही सेट फलंदाज नव्हता, हीच मोठी अडचण ठरली. जेव्हा सेट फलंदाज खेळत असतो, तेव्हा खेळपट्टीवर काही विशेष घडत नाही असं वाटतं. तरीही मला वाटतं गोलंदाजांसाठी थोडी मदत होतीच. नवीन फलंदाजांसाठी खेळणं सोपं नव्हतं, कारण लेंग्थचे चेंडू थोडे थांबत होते. संजू सॅमसनने ज्या प्रकारे सामना संपवला, त्यावरून स्पष्ट होतं की सेट फलंदाज किती महत्त्वाचा असतो,” असं तो पुढे म्हणाला.
अक्षर पटेलची सामन्यानंतर कुलदीप यादववर टीका
कुलदीप यादवने तीन षटकांत ३४ धावा दिल्या आणि एकही बळी मिळवू शकला नाही, याच खेळपट्टीवर चेन्नईच्या नूर अहमद आणि अकील हुसैन या फिरकीपटूंना चांगली मदत मिळत होती. त्यामुळे अक्षर पटेलने अप्रत्यक्षपणे कुलदीपवर टीका केली, हे आश्चर्यकारक नव्हतं. “पाच विकेट्स गेल्यानंतर शेवटी ज्या पद्धतीने आम्ही फलंदाजी केली, तोच एक सकारात्मक मुद्दा होता. आम्हाला चांगला शेवट मिळाला. गोलंदाजीत मी कुलदीप यादवला मिस केलं, मला माझा साथीदार कुलदीप यादवची उणीव जाणवली,” असं अक्षर म्हणाले.
दिल्ली कॅपिटल्सकडे अजूनही प्लेऑफमध्ये जाण्याची संधी आहे, पण आता त्यांना उरलेले सर्व सामने जिंकणं आवश्यक आहे. १० सामन्यांत केवळ ८ गुणांसह संघ सध्या गुणतालिकेत ७व्या स्थानावर आहे. “नक्कीच, आता चुका करण्यासाठी अजिबात वाव नाही. आमची मानसिकता स्पष्ट ठेवावी लागेल. उरलेले चारही सामने आम्हाला जिंकावे लागतील,” असं अक्षर पटेलने स्पष्ट केलं.
