Axar Patel Statement: आयपीएल २०२६ स्पर्धेतील ३१ वा सामना सनरायझर्स हैदराबाद आणि दिल्ली कॅपिटल्स या दोन्ही संघांमध्ये पार पडला. या सामन्यात हैदराबादने दिल्लीवर एकतर्फी विजयाची नोंद केली. पहिल्या डावात फलंदाजी करताना हैदराबादने २४२ धावांचा डोंगर उभारला होता. या धावांचा बचाव करताना हैदराबादच्या गोलंदाजांनीही अप्रतिम गोलंदाजी केली. दिल्लीला २० षटकांअखेर १९५ धावा करता आल्या. यासह हैदराबादने हा सामना ४७ धावांनी आपल्या नावावर केला. दरम्यान या पराभवानंतर दिल्लीचा कर्णधार अक्षर पटेल काय म्हणाला? जाणून घ्या.
या पराभवानंतर बोलताना अक्षर पटेल म्हणाला, “आम्ही जे रनआऊट आणि कॅच सोडले (अभिषेक शर्माच्या बाबतीत), जर आम्ही ते पूर्ण केले असते तर आम्ही त्यांना कमी धावांवर रोखू शकलो असतो. पण हो, जर एखादा फलंदाजी इतकी चांगली फलंदाजी करत असेल आणि अचूक फटके मारत असेल, तर अशा कामगिरीचे श्रेय त्याला दिलेच पाहिजे. तर दुसरीकडे क्लासेनने ज्या पद्धतीने फलंदाजी केली, ते पाहता आमच्या गोलंदाजांची काहीच चूक नव्हती.”
तसेच तो पुढे म्हणाला की, “जेव्हा एखादा फलंदाज अशा प्रकारे फलंदाजी करतो, तेव्हा प्रशिक्षक आणि कर्णधार या दोघांनीही हे स्वीकारले पाहिजे की, अशावेळी कर्णधारही काही करू शकत नाही. मी गोलंदाजांना हेच सांगत होतो की, तुम्ही जर चांगली गोलंदाजी करत असाल आणि फलंदाजाने चांगला फटका मारला तर यात तुमची काहीच चूक नाही. पण क्षेत्ररक्षण करणं मात्र आमच्या हातात होतं. कॅच पकडणं, रन आऊट करणं हे नक्कीच करू शकतो. त्या बाबतीत आम्ही आणखी चांगली कामगिरी करू शकलो असतो.”
हैदराबादचा विजय
या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने नाणेफेक जिंकून हैदराबादला प्रथम फलंदाजी करण्याचं आमंत्रण दिलं होतं. हैदराबादकडून प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या सलामीवीर फलंदाज अभिषेक शर्माने नाबाद १३५ धावांची खेळी केली होती. तर हेनरिक क्लासेनने नाबाद ३७ धावांची खेळी केली. तर ट्रॅव्हिस हेडने देखील ३७ धावांची खेळी केली. या खेळीच्या बळावर सनरायझर्स हैदराबादने २० षटकांअखेर २ गडी बाद २४२ धावा केल्या. या धावांचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या दिल्लीकडून नितीश राणाने ५७ धावांची खेळी केली. तर समीर रिझवीने ४१ धावा केल्या. केएल राहुलने ३७ धावा केल्या. हैदराबादकडून इशान मलिंगाने सर्वाधिक ४ गडी बाद केले. दिल्लीला २० षटकांअखेर ९ गडी बाद १९५ धावा केल्या. हैदराबादने हा सामना ४७ धावांनी आपल्या नावावर केला.
