India vs England: भारत आणि इंग्लंड या दोन्ही संघांमध्ये आयसीसी टी-२० वर्ल्डकप २०२६ स्पर्धेतील दुसऱ्या सेमी फायनलचा सामना पार पडला. या सामन्यातील पहिल्या डावात फलंदाजी करताना भारतीय संघाने २५३ धावांचा डोंगर उभारला होता. सेमी फायनलमध्ये भारतीय फलंदाजांनी आपली भूमिका योग्यरित्या पार पाडली. त्यानंतर गोलंदाजांवर धावांचा बचाव करण्याची जबाबदारी होती. इंग्लंडच्या फलंदाजांनीही तुफान फटकेबाजी केली. भारतीय संघातील क्षेत्ररक्षकांची साथ मिळाली नसती, तर हा सामना जिंकणं कठीण होतं. यादरम्यान भारतीय संघातील अष्टपैलू खेळाडू अक्षर पटेलने २ भन्नाट झेल घेतले.
एकीकडे इंग्लंडच्या खेळाडूंकडून सोपे झेल सुटले, तर दुसरीकडे अक्षर पटेलने असे काही झेल टिपले जे पाहून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. अक्षर पटेलने मागच्या दिशेने धावत जाऊन हॅरी ब्रुकचा भन्नाट झेल घेतला. हा झेल पाहून सर्वांनाच भारताचे माजी कर्णधार कपिल देव यांची आठवण झाली. हा सामना पाहण्यासाठी रोहित शर्मा, एमएस धोनीसारख्या दिग्गज खेळाडूंनी हजेरी लावली होती. अक्षरने घेतलेला हा झेल पाहू सर्वांनी दिलेली रिअॅक्शन पाहण्यासारखी होती.
हॅरी ब्रुकचा झेल
तर झाले असे की, धावांचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या इंग्लंडला सुरूवातीलाच मोठे धक्के बसले होते. त्यावेळी चौथे षटक टाकण्यासाठी जसप्रीत बुमराह गोलंदाजीला आला. त्यावेळी इंग्लंडची धावसंख्या १ गडी बाद ३८ धावा होती. हॅरी ब्रुक स्ट्राईकवर असताना बुमराह गोलंदाजी करण्यासाठी आला. बुमराहच्या गोलंदाजीवर ब्रुकने मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी पॉईंटला क्षेत्ररक्षण करत असलेल्या अक्षर पटेलने मागच्या दिशेने धावत जाऊन भन्नाट झेल घेतला. हा झेल पकडताच, मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरचा आनंद गगनात मावेनासा झाला. १९८३ मध्ये झालेल्या वर्ल्डकप फायनलमध्ये कपिल देव यांनीही मागच्या दिशेने धावत जाऊन असाच काहीसा झेल घेतला होता.
सामन्यातील टर्निंग पॉईंट ठरलेला झेल
पहिल्या झेलमुळे भारतीय संघाने सामन्यावर पकड मजबूत केली. तर दुसऱ्या झेलमुळे भारतीय संघाने सामना जवळजवळ खिशात घातला. तर झाले असे की, सूर्यकुमार यादवने १४ वे षटक टाकण्याची जबाबदारी अर्शदीप सिंगकडे सोपवली. त्यावेळी विल जॅक्स आणि जेकब बेथेलची जोडी मैदानावर होती. दोघांनी मिळून इंग्लंडचा डाव सावरला होता. त्याामुळे भारतीय संघाला विकेटची गरज होती. अर्शदीपने टाकलेल्या चेंडूवर विल जॅक्से डीप पॉईंटच्या दिशेने मोठा फटका मारला. चेंडू वेगाने सीमारेषेपार जात होता. त्यावेळी अक्षर पटेल धावत आला आणि हवेतच झेल घेतला. त्याचा तोल जाऊन पडणार इतक्यात त्याने चेंडू शिवम दुबेकडे फेकला. यासह अक्षर पटेलच्या झेलमुळे विल जॅक्स बाद होऊन माघारी परतला.
