टी-२० विश्वचषकाचा भारत आणि इंग्लंड यांच्यादरम्यान मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर झालेला सेमी फायनलचा सामना थरारक असा होता. भारताने २५३ धावांचा प्रचंड डोंगर रचूनही इंग्लंडने लक्ष्याचा यशस्वी पाठलाग करण्याचा प्रयत्न केला. मात्र १६ व्या षटकानंतर भारतीय गोलंदाजांनी इंग्लंडला सामन्यात परतण्याची संधी दिली आहे. अक्षर पटेलचे दोन उत्कृष्ट झेल आणि एका विकेटमुळे भारताचा विजय सुकर झाला होता. तसेच त्याची एक ओव्हर बाकी असतानाही तो अखेरची ओव्हर टाकण्यासाठी आला नाही. याबाबत खुद्द अक्षरने सामन्यानंतर माहिती दिली.

इंग्लंडला अखेरच्या ओव्हरमध्ये ३० धावा हव्या होत्या. स्ट्राईकवर शतकवीर जेकब बेथल खेळत होता. अशावेळी कर्णधार सूर्यकुमारने अक्षर पटेलऐवजी शिवम दुबेच्या हातात चेंडू दिला. पहिल्याच चेंडूवर जेकब बेथल दोन धावा काढताना रन आऊट झाला आणि भारताचा विजय सुकर झाला. शिवम दुबेने अखेरच्या ओव्हरमध्ये २२ धावा दिल्या.

माझ्या गोलंदाजीवर ५ षटकार पडू दिले नसते

सामना जिंकल्यानंतर स्टार स्पोर्ट्शी संवाद साधताना अक्षर पटेलने अखेरच्या ओव्हरबाबत विधान केले. तो म्हणाला, मी अखेरची ओव्हर टाकण्यासाठी तयार होतो. लाँग ऑफला मी गोलंदाजीचा सरावही केला. माझ्या गोलंदाजीवर पाच षटकार तर नक्कीच बसले नसते.

“अखेरची ओव्हर टाकण्यासाठी मी तयार होतो. क्षेत्ररक्षण करता करता मी गोलंदाजीचा सरावही केला. ३० धावा खूप होतात. माझ्या गोलंदाजीवर ५ षटकार तर नक्कीच बसले नसते”, असे विधान अक्षरने केले.

सूर्यकुमारने फिल्डिंग कोचला दिले श्रेय

अक्षर पटेलने या सामन्यात ३ उत्कृष्ट झेल टिपले. तसेच चांगले फटके खेळण्याची क्षमता असलेल्या फिल सॉल्टलाही बाद केले होते. इंग्लंडचा कर्णधार बॅरी ब्रूकचा मागे धावत जात घेतलेला झेल घेतला. तर अर्शदीपच्या १४व्या षटकात त्याने शिवम दुबेसह विल जॅक्सचा झेल घेतला. हा झेल सामन्याचा टर्निंग पॉईंट ठरला.

सामन्यानंतर बोलताना भारताचा कर्णधार सूर्यकुमार यादवने फील्डिंग कोच दिलीप टी यांचे कौतुक केले. “संघाच्या उत्कृष्ट क्षेत्ररक्षणासाठी फील्डिंग कोच दिलीप टी यांना श्रेय द्यायला हवे. सराव सत्रांमध्ये ते ज्या पद्धतीने खेळाडूंना प्रशिक्षण देतात, त्यात मजा आणि स्पर्धात्मकता दोन्ही असते. त्यामुळे खेळाडूंनीही उत्तम प्रतिसाद दिला आहे. सरावानंतरही अनेक खेळाडू संघासाठी अतिरिक्त मेहनत घेतात आणि त्याचा परिणाम मैदानावर स्पष्टपणे दिसतो”, असे सूर्यकुमार म्हणाला.