संदीप गोपाळ
फुटबॉल वर्ल्डकपमध्ये सहभागी होण्यासाठी इराक संघाचं विमान अमेरिकेतल्या शिकागोमधल्या ओ हार विमानतळावर उतरलं. अमेरिकेच्या इमिग्रेशन अधिकाऱ्यांनी संघातल्या आयमेन हुसेनला चौकशीसाठी थांबवून घेतलं. तब्बल सात तास तो तिथेच होता. त्याचा फोन तपासण्यात आला. त्यानंतर त्याला प्रवेश देण्यात आला. संघाच्या फोटोग्राफरला प्रवेश मिळाला. अमेरिका आणि इराक यांच्यात जे जे घडलंय त्याची पार्श्वभूमी या सगळ्याला होती. परिस्थिती निवळली असली असं अधिकारी वर्ग भासवत असला तरी सात तासांच्या चौकशीतून गोष्टी पूर्ववत झालेल्या नाहीत हे स्पष्ट झालं.
अतिरिक्त चौकशीचा कोणताही ताण न घेता हुसेन सरावाच्या वेळी संघाबरोबर होता. याच्यापेक्षा वाईट परिस्थिती त्याने अनुभवली आहे. ड्रोन आणि बुलेट्स यांचाच आवाज सतत घुमणाऱ्या अल साफरा नावाच्या गावात तो लहानाचा मोठा झाला. किरकुकमधल्या हाविजा जिल्ह्यात हे गाव आहे. त्याचे वडील इराकच्या लष्करात होते. तो बारा वर्षांचा असताना अल कायदाच्या दहशतवाद्यांनी त्यांची हत्या केली. ते उभारत असलेल्या घरासाठी सामान आणायला गेले होते. त्याचवेळी त्यांच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या. हुसेनने भाऊ आणि आईला पळायला सांगितलं. भावाने पळून जायला नकार दिला. थोड्या वेळातच भावाचं अपहरण करण्यात आलं. आयसिसच्या दहशतवाद्यांनीच हे केलं असावं असा संशय आहे. भाऊ अद्यापही परतलेला नाही. त्याचा शोध घेण्यात आला पण ठावठिकाणी कळलेला नाही.
‘वडिलांनी जे घर बांधायला घेतलं होतं ते अद्यापही अपूर्णच स्थितीत आहे. मला फुटबॉल प्रचंड आवडतो’, हुसेनने फिफाशी बोलताना सांगितलं. ‘बाबांचं घराचं स्वप्न अपुरं राहिलं होतं. पैसे कमवावेत जेणेकरून हे स्वप्न प्रत्यक्षात साकारता येईल’. १८ वर्षांनंतर हुसेनने केलेल्या गोलच्या बळावर इराकचा संघ ४० वर्षांनंतर वर्ल्डकपमध्ये खेळतो आहे.
वर्ल्डकपसाठी शिकागो गाठण्यापूर्वीच इराकच्या संघाने पात्रतेचा खडतर मार्ग पार केला होता. इराकने २८ महिन्यात पात्रता फेरीचे २१ सामने खेळले. बसरा, मस्कत, जाकार्ता आणि माँटेनरे अशा ठिकाणी हे सामने झाले. प्लेऑफ फायनलचा बोलिव्हियाविरुद्धचा सामना इराणविरुद्धच्या युद्धामुळे रद्द होण्याच्या बेतात होता. नॉदर्न मेक्सिकोत हा सामना अखेर झाला. विमानसेवा स्थगित करण्यात आली होती. २५ तास प्रवास करून इस्तंबूलला जाण्याचा विचारही त्यांनी केला. मात्र प्रवासादरम्यान आक्रमणाला सामोरं जावं लागण्याची शक्यता असल्यानो तो विचार सोडून देण्यात आला. वाळवंटामार्गे जॉर्डनला जाण्याचा निर्णय घेण्यात आला. अम्मानला पोहोचण्यासाठी काही खेळाडूंनी २८ तास प्रवास केला. क्षेपणास्त्रांच्या माऱ्यामुळे ते तिथेच ३६ तास अडकून पडले. कशीबशी सुटका झाली आणि त्यांनी लिस्बन आणि त्यानंतर माँटेरेला जाणारं विमान पकडलं.
‘आम्ही काळजी करत बसलो नाही’, हुसेनने अल जझीराशी बोलताना सांगितलं. ‘बॉम्बस्फोट आणि गोळ्यांचा मारा यांची आम्हाला सवय झाली आहे. चांगल्या गोष्टी संयम दाखवल्याबिगर घाईघाईत मिळत नाहीत हे एव्हाना आम्हाला कळलं आहे’. माँटेरे इथे ते खेळले आणि जिंकले. वर्ल्डकपमध्ये ते दाखल झाले. इराकचे निम्मे खेळाडू स्थलांतरित आहेत. माल्मो, अॅमस्टरडॅम, लिव्हरपूल आणि वॉर्सा अशा विविध ठिकाणी ते असतात. त्यांचे प्रशिक्षक ग्रॅहम अरनॉल्ड ऑस्ट्रेलियाचे आहेत. विविधांगी पार्श्वभूमीचे खेळाडू एकत्र असल्याने भाषेचा प्रश्न ऐरणीवर आला. अरनॉल्ड यांनी अनोख्या पद्धतीने तो प्रश्न सोडवला. संघातले ८० टक्के खेळाडू अरेबिक भाषा बोलतात.खेळाडूंना त्यांच्या कौशल्यानुसारच पोझिशन दिली जाते पण त्याचवेळी भाषेची अडचण माझ्या लक्षात आली. एकमेकांची भाषा येत नसल्याने ते बोलत नसत. अरनॉल्ड यांनी यावर उतारा शोधला. इंग्रजी बोलणारे खेळाडू लेफ्ट साईडला, अरेबिक बोलणारे राईट साईडला. सेंटर बॅक आणि सेंट्रल मिडफिल्डर या ठिकाणी दोन्ही भाषा बोलू शकणारे खेळाडू तैनात करण्यात आले. भाषा अडसर ठरण्याऐवजी संवादसेतू झाली.
घरच्यांना काळजी वाटत असूनही अरनॉल्ड आठ महिने बगदाद इथे राहिले. त्यांनी इराकची संस्कृती समजून घेतली. खेळाडूंच्या सवयी, आवडीनिवडी जाणून घेतलं. सरावाला उशिरा येणाऱ्या खेळाडूंना त्यांनी दंड केला. प्लेऑफच्या लढतीसाठी इराकचा संघ माँटेरे इथे दाखल झाला तेव्हा अरनॉल्ड संघाला म्हणाले- ‘तुम्ही इथे पोहोचण्यासाठी खडतर मार्ग पार केला आहे. तुम्ही अनेक प्रतिकूल गोष्टींचा सामना करत इथवर पोहोचला आहात. तुमच्या कुटुंबीयांनी अनेक गोष्टींचा त्याग केला आहे. आता तुम्ही सामन्यासाठी इथे पोहोचला आहात. आता देशवासीयांना, कुटुंबीयांना अभिमानास्पद वाटेल अशी कामगिरी करा’. आपण काय बोलतोय याची अरनॉल्ड यांना कल्पना होती.
खेळाडूंवर दडपण होतं. ४६ दशलक्ष चाहत्यांचा पाठिंबा त्यांच्या पाठीशी होता. प्रत्येक सामना करो या मरो असाच होता. फॉरवर्ड पोझिशनला खेळणारा अली अल हमदी इराकसाठी महत्त्वाचा आहे. त्याच्या कुटुंबीयांनी इराक सोडलं तेव्हा तो दोन वर्षांचा होता. सद्दाम हुसेनची सद्दी असताना त्याच्या वडिलांना तुरुंगात टाकण्यात आलं होतं. ते वकील होते. त्याची आई गरोदर असताना इराकच्या मायसन भागात होती. हुसेन कुटुंबीयांनी इराक सोडलं आणि ते लिव्हरपूल मधल्या टॉक्स्टे इथे स्थायिक झाले. आजूबाजचा परिसर सामाजिकदृष्ट्या संवेदनशील होता. हुसेनला वांशिक शेरेबाजीला सामोरं जावं लागलं. ‘मी चुकीच्या संगतीत वाढलो. उशिरापर्यंत घराबाहेर असायचो. पण मी वेळीच त्यातून बाहेर पडलो, असं त्याने सांगितलं.
इराकच्या गटात फ्रान्स, नॉर्वे आणि सेनेगल हे संघ आहेत. वर्ल्डकपसाठी पात्र होणारा प्रत्येक संघ तुल्यबळ असतो. कोणालाच कमी लेखून चालणार नाही. लायन्स ऑफ मेसोपोटेमिया अर्थात इराकचा संघ सर्वोत्तम प्रदर्शनासाठी सज्ज आहे. क्षेपणास्त्र, वाळवंटं, ड्रोनचे हल्ले हे सगळं त्यांनी परतावून लावलं आहे. हुसेनने कोणतीही तक्रार केली नाही आणि सात तासांची चौकशी प्रक्रिया पार करून तो संघाला भेटला. अल साफरा इथे त्याच्या वडिलांचं अधुरं स्वप्न तसंच पूर्ण होण्याच्या प्रतीक्षेत आहे. हुसेन हे विसरलेला नाही.
