SMAT 2025 Ayush Mhatre Back To Back Centuries: सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी स्पर्धेत मराठमोळ्या आयुष म्हात्रेचं वादळ पाहायला मिळत आहे. मुंबई संघाचा सलामी फलंदाज आयुष म्हात्रेने स्पर्धेत सलग दुसरं वादळी शतक झळकावलं आहे. सूर्यकुमार यादवसह उत्कृष्ट भागीदारी रचत आयुष म्हात्रेने मुंबईला ९ विकेट्सने एकतर्फी शानदार विजय मिळवून दिला.
मुंबई आणि आंध्रप्रदेश यांच्यात सय्यद मुश्ताक अली स्पर्धेतील ५६ वा सामना खेळवला गेला. या सामन्यात आयुष म्हात्रेच्या नाबाद १०४ धावांच्या खेळीच्या जोरावर मुंबईने आंध्राला पराभवाचं पाणी पाजल. तर आयुष म्हात्रेसह सूर्यकुमार यादवने ३१ धावांची खेळी केली. या दोघांनी मुंबईच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली. तर गोलंदाजीत तुषार देशपांडेने ३ विकेट्स घेतले.
मुंबईने नाणेफेक जिंकत आंध्रा संघाला प्रथम फलंदाजीसाठी पाचारण केलं. आंध्राने यासह कर्णधार रिकी भुईच्या ४८ धावांच्या खेळीच्या बळावर ७ बाद १९ धावांची खेळी केली. मुंबईकडून या सामन्यात तुषार देशपांडेने ३ विकेट्स, साईराज पाटीलने २ विकेट्स तर शम्स मुलानीने एक विकेट्स घेतल्या. आंध्राला कमी धावांवर रोखल्यानंतर सूर्या व आयुषने मुंबईला विजय मिळवून दिला.
१५८ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना १५.२ षटकांत मुंबईने विजय मिळवला. आयुष म्हात्रेने ५९ चेंडूत ५ चौकार व ९ षटकारांसह १७६.२७ च्या स्ट्राईक रेटने १०४ धावांची नाबाद खेळी केली. याशिवाय सूर्यकुमार यादवने २१ चेंडूत १ चौकार व २ षटकारांसह ३१ धावांची खेळी करत आयुषला साथ दिली. याआधी अजिंक्य रहाणे १२ चेंडूत २ षटकारांसह १८ धावा करत बाद झाला.
आयुष म्हात्रेने या आधी विदर्भविरूद्ध सामन्यात ४९ चेंडूत शतकी खेळी केली होती. विदर्भविरूद्धही आयुषने धावांचा पाठलाग करताना ५९ चेंडूत ८ चौकार व ८ षटकारांसह ११० धावांची वादळी खेळी केली होती. यानंतर आता आंध्राविरूद्धही त्याने शतक झळकावलं.
