Ayush Mhatre Record In IPL: आयपीएल २०२६ स्पर्धेतील सातवा सामना चेन्नई सुपर किंग्ज आणि पंजाब किंग्ज या दोन्ही संघांमध्ये सुरू आहे. चेन्नईतील चेपॉकच्या मैदानावर सुरु असलेल्या या सामन्यात आयुष म्हात्रेच्या फलंदाजीचा बोलबाला पाहायला मिळाला आहे. तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या आयुष म्हात्रेने ४३ चेंडूंचा सामना करत १६९.७७ च्या स्ट्राईक रेटने फलंदाजी करताना ६ चौकार आणि ५ षटकारांचा सामना करत ७३ धावांची खेळी केली. या खेळीच्या बळावर चेन्नई सुपर किंग्ज संघाने पहिल्या डावात फलंदाजी करताना २० षटकांअखेर ५ गडी बाद २०९ धावा केल्या. यादरम्यान आयुष म्हात्रेने माजी फलंदाज सुरेश रैनाचा मोठा रेकॉर्ड मोडून काढला आहे.
या सामन्यातील पहिल्या डावात फलंदाजी करण्यासाठी आलेल्या चेन्नई सुपर किंग्ज संघाला सुरुवातीलाच मोठा धक्का बसला होता. संजू सॅमसन अवघ्या ७ धावा करुन माघारी परतला. त्यानंतर आयुष म्हात्रे आणि कर्णधार ऋतुराज गायकवाडने मिळून संघाचा डाव सांभाळला. दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी मिळून ९६ धावा जोडल्या. आयुष म्हात्रेने तुफान फटकेबाजी केली. तर ऋतुराज गायकवाडने त्याला चांगली साथ देत १७ चेंडूत २२ धावांची खेळी केली. या भागीदारीदरम्यान आयुष म्हात्रेने ६७ धावांचे योगदान दिले.
आयुष म्हात्रेने मोडला सुरेश रैनाचा रेकॉर्ड
आयुष म्हात्रेचं हे चेन्नई सुपर किंग्ज संघासाठी दुसरंच हंगाम आहे. यादरम्यान चेन्नईसाठी चेपॉकच्या मैदानावर खेळताना त्याने मोठा रेकॉर्ड आपल्या नावावर केला आहे. आयुष म्हात्रे हा चेपॉकच्या मैदानावर अर्धशतकी खेळी करणारा सर्वात युवा फलंदाज ठरला आहे. आयुषने हा कारनामा वयाच्या १८ व्या वर्षी ( १८ वर्ष २६१ दिवस) केला आहे. याआधी चेपॉकच्या मैदानावर अर्धशतक झळकावणाऱ्या सर्वात युवा फलंदाजाचा रेकॉर्ड हा सुरेश रैनाच्या नावावर होता. सुरेश रैनाने वयाच्या २१ व्या वर्षी (२१ वर्ष १४८ दिवस) चेपॉकच्या मैदानावर खेळताना अर्धशतक झळकावलं होतं.
चेन्नईने केल्या २०९ धावा
या सामन्यातील पहिल्या डावात फलंदाजी करण्यासाठी आलेल्या चेन्नईकडून संजू सॅमसन अवघ्या ७ धावा करुन माघारी परतला. ऋतुराज गायकवाडने २८ धावांचे योगदान दिले. आयुष म्हात्रेने ७३ धावांची खेळी केली. तर शेवटी शिवम दुबेने नाबाद ४५ धावांची खेळी केली. तर सर्फराज खानने ३२ धावा केल्या.
