Ayush Mhatre On Ms Dhoni: आगामी रणजी ट्रॉफी स्पर्धेला येत्या ११ ऑक्टोबरपासून सुरुवात होणार आहे. या हंगामाआधी मुंबई क्रिकेट असोसिएशनने मोठी घोषणा केली आहे. अनुभवी खेळाडू सिद्धेश लाडकडे संघाच्या कर्णधारपदाची धुरा सोपवण्यात आली आहे. तर युवा खेळाडू आयुष म्हात्रेकडे संघाच्या उपकर्णधारपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. आगामी रणजी ट्रॉफी हंगाम सुरू होण्यापूर्वी पत्रकार परिषद झाली. या पत्रकार परिषदेत आयुष म्हात्रेने मिळालेल्या नव्या जबाबदारीबद्दल आणि एमएस धोनीच्या नेतृत्वाखाली खेळण्याचा कसा फायदा झाला, याबाबत वक्तव्य केलं.

आयुष म्हात्रेने ऑक्टोबर २०२४ मध्ये मुंबईच्या वरिष्ठ संघासाठी पदार्पण केलं होतं. कमी वेळात त्याने मुंबईच्या संघात आपलं स्थान बळकट केलं आहे. यावर्षी झालेल्या भारतीय अंडर वर्ल्डकप स्पर्धेत भारतीय संघाला जेतेपद मिळवून देण्यात त्याने मोलाची भूमिका बजावली होती. आयुषला २०२५ मध्ये आयपीएल स्पर्धेत चेन्नई सुपर किंग्ज संघासाठी खेळण्याची संधी मिळाली. यादरम्यान त्याने सुरुवातीच्या सामन्यांमध्ये दमदार कामगिरी केली होती. पण त्यानंतर त्याला दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर व्हावं लागलं होतं.

एमएस धोनीच्या नेतृत्वाखाली खेळण्याबाबत बोलताना आयुष म्हात्रे म्हणाला, “धोनी नेहमी फिल्डवर आणि फिल्डबाहेर खूप शांत असतो. धोनीने मला एकच गोष्ट सांगितली , ती म्हणजे, कधीही कर्णधारपद मिळालं तर शांत राहा. राग फक्त ५ मिनिटांचा असतो. पण त्या रागात घेतलेले निर्णय अनेकदा चुकीचे ठरतात.”

तसेच तो पुढे म्हणाला की, “शांत झाल्यावरच परिस्थितीचा चांगला विचार करून योग्य निर्णय घेता येतो. मैदानावर जितकं शांत राहून निर्णय घेता येतील, तितके ते संघासाठी आणि स्वतःसाठी फायदेशीर ठरतात.” धोनीकडून याच गोष्टी शिकून घेण्यासारख्या असल्याचं आयुष म्हात्रेने सांगितलं. अंडर-१९ वर्ल्डकप स्पर्धेतही भारतीय संघाचं नेतृत्व करताना तो शांत राहिला होता.