दमदार फॉर्मात असणारा युवा धडाकेबाज फलंदाज आयुष म्हात्रे उर्वरित आयपीएल हंगामात खेळू शकणार नसल्याचं स्पष्ट झालं आहे. चेन्नई सुपर किंग्स संघासाठी हा मोठा धक्का आहे.

यंदाच्या हंगामात आयुषने चेन्नईसाठी सर्वाधिक धावा केल्या आहेत. १८वर्षीय आयुषला सनरायझर्स हैदराविरुद्धच्या लढतीत मांडीच्या स्नायूंना दुखापत झाली होती. चेन्नईच्या फिजिओंनी मैदानात धाव घेत त्याच्यावर उपचार केले होते. त्यानंतर आयुष पुन्हा खेळण्यासाठी सज्ज झाला. कर्णधार ऋतुराज गायकवाडने एकेरी धाव घेतली. मात्र दुखापत गंभीर असल्याने आयुषने लंगडत कशीबशी ही धाव पूर्ण केली. तो रनआऊट होता होता वाचला. फिजिओ पुन्हा मैदानात आले. मात्र त्याला खेळता येणार नसल्याचं स्पष्ट झालं.

आयुषची दुखापत बरी होण्यासाठी ६ ते १२ आठवड्यांचा कालावधी लागणार असल्याने उर्वरित हंगामात तो खेळू शकणार नाही असं चेन्नई सुपर किंग्सने जारी केलेल्या निवेदनात म्हटलं आहे. चेन्नईचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी पायाला झालेल्या दुखापतीमुळे या हंगामात एकही सामना खेळू शकलेला नाही. मधल्या फळीतील आक्रमक फलंदाज डेवाल्ड ब्रेव्हिसही काही सामने दुखापतीमुळे खेळू शकला नव्हता. डावखुरा वेगवान गोलंदाज खलील अहमद दुखापतग्रस्त झाल्याने उर्वरित हंगामात खेळू शकणार नसल्याचं स्पष्ट झालं होतं. त्यातच आयुषची भर पडल्याने चेन्नईच्या अडचणी वाढल्या आहेत.

सुरुवातीला आलेल्या बातम्यांनुसार आयुष तीन आठवडे खेळू शकणार नसल्याची चर्चा होती मात्र एक्स रे चाचण्या आणि फिजिओंनी केलेलं निदान यानुसार त्याला दुखापतीतून सावरण्यासाठी अधिक कालावधी लागणार आहे. आयुषच्या नेतृत्वात भारताने U19 वर्ल्डकपच्या जेतेपदावर नाव कोरलं होतं. गेल्या हंगामात ऋतुराज गायकवाड जायबंदी झाल्याने आयुषला संधी मिळाली होती. मुंबईकर आयुषने चांगली कामगिरी करत चेन्नईच्या संघव्यवस्थापनाचा विश्वास जिंकला.

यंदाच्या हंगामात आयुषने तिसऱ्या क्रमांकावर खेळताना ६ सामन्यात १७७च्या स्ट्राईकरेटने २०१ धावा केल्या आहेत. आयुषचा फॉर्म ही चेन्नईसाठी जमेची बाजू होती. मात्र आता तो नसल्यामुळे चेन्नईला डावपेचांमध्ये बदल करावे लागणार आहेत. दरम्यान ‘आयुषला सामन्याआधीही हॅमस्ट्रिंगचा त्रास जाणवत होता. मात्र तरीही त्याला फलंदाजीला पाठवण्यात आला. धावणं सोडा, चालणंही अवघड झालेलं असतानाही एकेरी धाव घेण्यात आली. यामुळे दुखापत चिघळू शकते, हे करण्याची काहीच आवश्यकता नव्हती. ही परिस्थिती अधिक चांगल्या पद्धतीने हाताळता आली असती’, असं मत भारतीय संघाचा माजी फिरकीपटू रवीचंद्रन अश्विनने व्यक्त केलं होतं.

आयुषच्या अनुपस्थितीत उर्विल पटेलला संधी मिळण्याची चिन्हं आहेत. दरम्यान चेन्नई संघव्यवस्थापनाने आयुषऐवजी बदली खेळाडूची घोषणा तूर्तात तरी केलेली नाही.