Ayush Mhatre Statement: आयुष म्हात्रेच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या भारतीय संघाने करून दाखवलं. अंडर-१९ वर्ल्डकप २०२६ स्पर्धेतील अंतिम सामना भारत आणि इंग्लंड या दोन्ही संघांमध्ये पार पडला. या सामन्यातील पहिल्या डावात फलंदाजी करताना भारतीय फलंदाजांनी चौकार आणि षटकारांचा पाऊस पाडला. वैभव सूर्यवंशीच्या १७५ धावांच्या वादळी खेळीच्या बळावर भारतीय संघाने ४११ धावांचा डोंगर उभारला. या धावांचा पाठलाग करताना इंग्लंडच्या फलंदाजांनी पूर्ण जोर लावला. पण भारतीय संघाने हा सामना १०० धावांनी आपल्या नावावर केला. दरम्यान या विजयानंतर बोलताना भारतीय संघाचा कर्णधार आयुष म्हात्रेने भारतीय खेळाडूंचं तोंडभरून कौतुक केलं.
वर्ल्डकपची ट्रॉफी जिंकल्यानंतर कर्णधार आयुष म्हात्रे म्हणाला, “मी माझ्या भावना शब्दात व्यक्त करू शकत नाही. पण हा आमच्यासाठी एक अविस्मरणीय क्षण आहे. मुलांनी खरोखरच खूप छान कामगिरी केली. आम्ही जी उद्दिष्टे ठेवली होती, ती त्यांनी उत्तमरीत्या पूर्ण केली. सर्वांनी आपला नैसर्गिक खेळ केला.त्यामुळे, मला खरोखर खूप आनंद झाला आहे.”
तसेच वैभव सूर्यवंशीचं कौतुक करताना आयुष म्हणाला, “तो फक्त आपल्या खेळावर लक्ष केंद्रित करतो. त्याने ज्या प्रकारची खेळी केली, त्यासाठी आमच्याकडे शब्दच नाहीत. तो एक दर्जेदार फलंदाज आहे हे आम्हाला ठाऊक होतं आणि तो काय करू शकतो हे त्याने या सामन्यात दाखवून दिलं आहे.”
भारतीय संघाने २०२४ मध्ये झालेल्या टी-२० वर्ल्डकप स्पर्धेत रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली खेळताना जेतेपदाची ट्रॉफी उंचावली होती. त्यानंतर २०२५ मध्ये झालेल्या महिला विश्वचषक स्पर्धेत हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखाली खेळताना भारतीय संघाने पहिल्यांदाज वर्ल्डकपची ट्रॉफी उंचावली होती. या परंपरेबद्दल बोलताना आयुष म्हात्रे म्हणाला, “रोहित शर्माने वर्ल्डकप जिंकला, हरमनप्रीतनेही जिंकला आणि आता आम्ही… त्यामुळे हा वारसा पुढे नेताना आम्हाला खूप आनंद होतोय. ही परंपरा अशीच पुढे नेण्याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे.”
तसेच आयुष म्हात्रेने सपोर्ट स्टाफमधील सदस्यांनाही विजयाचं श्रेय दिलं. सपोर्ट स्टाफमधील सदस्यांबाबत बोलताना तो म्हणाला, “सपोर्ट स्टाफबद्दल बोलायला शब्द अपुरे आहेत. गेल्या ७-८ महिन्यांपासून ते आमच्यासाठी खूप राबत आहेत. आम्ही आज जे काही आहोत, त्याचं श्रेय त्यांनाच जातं, कारण त्यांनी आमच्यावर खूप मेहनत घेतली आहे.”
