निंगबो (चीन) : भारताच्या आयुष शेट्टीने कारकीर्दीतील सर्वांत मोठ्या विजयाची नोंद करताना शुक्रवारी आशियाई अजिंक्यपद बॅडमिंटन स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला. आयुषने जागतिक क्रमवारीत चौथ्या स्थानावर असलेल्या, पण स्पर्धेत तिसरे मानांकन मिळालेल्या इंडोनेशियाच्या जोनाथन क्रिस्टीला पराभवाचा धक्का दिला.

जागतिक क्रमवारीत २५व्या क्रमांकावर असलेल्या आयुषने अष्टपैलू खेळ आणि जोरदार स्मॅशच्या जोरावर उपांत्यपूर्व फेरीच्या लढतीत २३-२१, २१-१७ असा विजय मिळवला. उपांत्य फेरीत आयुषची अग्रमानांकित थायलंडच्या कुनलावत वितिदसर्नशी गाठ पडेल. वितिदसर्न पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेतील रौप्यपदक विजेता आहे.

उपांत्यपूर्व लढतीत पहिल्या गेमच्या सुरुवातीला आयुषने २-० आणि ५-३ अशी आघाडी घेतली होती. परंतु नंतर जोनाथनने आयुषला ‘बॅकलाईन’वर रोखले. गेमच्या अखेरच्या टप्प्यात जोनाथन १८-१६ अशी आघाडी राखून होता. या स्थितीत आयुषने जोरकस प्रतिकार करत १८-१८ अशी बरोबरी साधली. मात्र, एक फटका बाहेर गेल्याने जोनाथनला दोन ‘गेम पॉइंट्स’ मिळाले. यातील एक पॉइंट जोनाथनने मिळवला.

मात्र, नंतर जोनाथनकडून चुका झाल्या आणि आयुषने पहिला गेम अखेरच्या क्षणी जिंकला. आयुषने दुसर्या गेममध्ये अधिक आक्रमकता दाखवली आणि जोनाथनला निष्प्रभ केले.