वृत्तसंस्था, नवी दिल्ली : भारताच्या अनुभवी बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधू आणि महिला दुहेरीत ट्रीसा जॉली-गायत्री गोपीचंद यांच्या विजयी मोहिमेवर कळस चढवत पुरुष एकेरीत भारताच्या आयुष शेट्टीने जागतिक क्रमवारीत अग्रस्थनावार असलेला चीनचा गतविजेता शी यु की याचे आव्हान संघर्षपूर्ण लढतीत पहिल्याच फेरीत संपुष्टात आणले.आयुषने कमालीच्या निग्रहाने खेळ करताना शी यु की याचे आव्हान २१-१४, १३-२१, २१-१९ असे परतवून लावले. त्यापूर्वी सिंधूने महिला एकेरीत आयर्लंडच्या सोफिया नोबलचा २१-७, २१-११ असा पराभव केला. महिला दुहेरीत ट्रीसा जॉली आणि गायत्री गोपीचंद जोडीने स्पेनच्या पॉला लोपेझ आणि लुसिया रॉड्रिग्ज जोडीचा २१-९, २१-१३ असा पराभव केला.

आयुषने पहिल्या गेमला कोर्टच्या जवळत्या बाजूने खेळ करत सामन्यावर नियंत्रण मिळविले. या खेळाने आयुषने शी युकीवरील दबाब वाढवला. शी यु कीला लय गवसण्यापूर्वीच आयुषने वेगवान रॅलीज आणि अचूक फटक्यांच्या जोरावर पहिला गेम सहज जिंकला. दुसर्‍या गेमला शी यु कीने आपल्या अनुभवाचा वापर केला. कोर्टची बाजू बदलल्याचाही फायदा शी यु कीला झाला. यु कीने नेटवरील अप्रतिम खेळाला आपल्या जोरकस स्मॅशची सुरेख जोड दिली. यामुळे आयुषची लय बिघडली आणि युकीने याचा फायदा घेत दुसरा गेम जिंकत बरोबरी साधली.

दोन गेमच्या बरोबरीमुळे तिसर्‍या गेमेमधील तीव्रता अधिक वाढली होती. जागतिक क्रमवारीत अव्वल आणि गतविजेता शी यु की समोर असल्याने या निर्णयाक गेमला आयुषवर मानसिक दडपण होते. मात्र, प्रेक्षकांच्या उस्त्फूर्त पाठिंब्याच्या जोरावर आयुषने यु कीवर वर्चस्व राखण्यास सुरुवात केली. यापूर्वी यु कीविरुद्ध झालेल्या तीनही पराभवाचे जुने ओझे फेकून देत आयुषने कमालीच्या निग्रहाने खेळ केला. शी यु कीने प्रदिर्घ रॅलीजचा खेळ करत आयुषला दमविण्याचा प्रयत्न केला. पण, या कसोटीतही आयुष खरा उतरला.

तिसर्‍या गेमला आयुषने एकवेळ १७-७ अशी मोठी आघाडी मिळवली होती. मात्र, यु कीने आपल्या ताकदवान आणि जोरकस फटक्यांच्या जोरावर १८-१५ अशी पिछाडी भरुन काढली. त्यानंतर आयुषने २०-१६ अशी आघाडी घेत चार मॅट पॉइंट मिळवले. यु कीने या वेळीही आयुषला ड्रॉप शॉट्सच्या जोरावर आव्हान दिले आणि २०-१९ अशी स्थिती निर्माण केली. मात्र, कमालीचा संयम राखत बॅकहँड व्हॉलीवर विजयी गुण मिळवला आणि जागतिक स्पर्धेतील पहिल्याच फेरीत सनसनाटी निकालावर शिक्कामोर्तब केले.

शी यु कीच्या आक्रमक खेळाची माहिती असल्यामुळे आयुषने आपल्या बचावात कमालीची सुधारणा केली होती. यु कीचे वेगवान आणि अचूक स्मॅशेस त्याने शिताफीने परतवून लावले. नेटवर येत ड्रॉप शॉट्सचा सुरेख वापर करुन त्याने यु कीला चुका करण्यास भाग पाडले. सर्वात महत्त्वाचे म्हणजे गतविजेत्यासमोर पहिल्याच फेरीत खेळताना आयुषने आखलेली रणनिती अचूक ठरली. कणखर मानसिकता आणि युकीच्या खेळातील गतीच्या बदलांचा अचूक अभ्यास हा आयुषच्या विजयात निर्णायक ठरला.

घरच्या मैदानावर पहिल्याच फेरीत खेळताना आयुषवर गमावण्यासारखे काहीच नव्हते. कोर्टच्या वातावरणाशी जुळवून घेण्याचे संपूर्ण दडपण जागतिक अग्रस्थानी असणार्‍या यु कीवर होते, ज्याचा आयुषने अचूक फायदा उठवला, अशी प्रतिक्रिया आयुषचे प्रशिक्षक सागर चोपडा यांनी व्यक्त केली.

निर्विवाद वर्चस्व

सिंधूने सुरुवातीपासूनच आपल्या कमी अनुभवी प्रतिस्पध्र्याला दबावाखाली ठेवले. पहिल्या गेममध्ये उत्कृष्ट खेळ आणि संयमी रणनीतीच्या जोरावर सिंधूने मध्यांतरापर्यंत ११-२ अशी मोठी आघाडी घेतली आणि त्यानंतर पहिला गेम सहज खिशात टाकला. दुसर्‍या गेममध्ये मात्र सोफियाने काहीसा प्रतिकार करत सिंधूला आव्हान देण्याचा प्रयत्न केला. परंतु, सिंधूने आपल्या अनुभवाचा वापर करत मध्यंतरापर्यंत ११-८ अशी आघाडी राखली. मध्यांतरानंतर सिंधूने सोफियाला पुनरागमन करण्याची कोणतीही संधी दिली नाही. तिने उत्कृष्ट ड्रॉप शॉट्स आणि स्मॅशेस मारत रॅलीजवर नियंत्रण मिळवले आणि नेटजवळून सुरेख बॅकहँड ड्रॉप फटक्याने विजयावर शिक्कामोर्तब केले. दुसर्‍या फेरीत सिंधूचा सामना कॅनडाच्या वेन यू झँग हिच्याशी होईल. झँगने बल्गेरियाच्या स्टेफनी स्टोएव्हाचा २१-७, २१-१९ असा पराभव केला.

राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतील कांस्यपदक विजेती भारताची महिला दुहेरी जोडी ट्रीसा जॉली आणि गायत्री गोपीचंद जोडीने देखील पहिल्या फेरीत सोपा विजय नोंदवला. त्यांनी स्पेनच्या पॉला लोपेझ आणि लुसिया रॉड्रिग्ज जोडीचा सरळ दोन गेममध्ये पराभव केला. भारतीय जोडीची आक्रमकता निर्णायक ठरली. भारतीय जोडीचा पुढील सामना अमेरिकेच्या १६व्या मानांकित लॉरेम लॅम आणि ॲलिसन क्विन ली जोडीशी होईल. पुरुष दुहेरीत भारताच्या हरीहरन अम्साकरुणन आणि एम. आर. अर्जुन जोडीने दुसर्‍या फेरीत प्रवेश केला. भारतीय जोडी २१-१६, ६-४ अशी आघाडीवर असताना प्रतिस्पर्धी स्कॉट गिल्डेआ आणि पॉल रेनॉल्ड्स या आयर्लंडच्या जोडीने दुखापतीमुळे सामन्यातून माघार घेतली.

ऐतिहासिक कामगिरी

आयुष शेट्टी हा सातत्याने जागतिक स्तरावरील मोठ्या खेळाडूंना पराभूत करीत आहे. यापूर्वी त्याने २०२६ च्या आशियाई अजिंक्यपद स्पर्धेमध्ये ऑलिम्पिक रौप्यपदक विजेत्या कुनलावुत वितिदसर्नला आणि मलेशियन स्पर्धेमध्ये ली झी जियाला पराभूत केले होते. या वेळी जागतिक क्रमवारीत अग्रस्थानावर असलेल्या शी युकीचा पराभव करून त्याने आंतरराष्ट्रीय स्तरावरील अनपेक्षित निकाल नोंदविण्याची आपली ओळख सार्थ ठरवली.