निंगबो (चीन) : भारताच्या आयुष शेट्टीने आशिया अजिंक्यपद बॅडमिंटन स्पर्धेतील स्वप्नवत घोडदौड कायम राखताना अंतिम फेरीत धडक मारली. आयुषने शनिवारी झालेल्या उपांत्य लढतीत गतविजेता आणि अग्रमानांकित कुन्लावत वितिदसर्न याच्यावर १०-२१, २१-१९, २१-१७ असा शानदार विजय मिळवला. विजेतेपदासाठी आयुषची गाठ आता द्वितीय मानांकित शी यू क्यू याच्याशी पडेल. दुसर्‍या उपांत्य फेरीत शी यू क्यू याने तैपेइच्या चौथ्या मानांकित चाऊ टिएन चेन याचा २१-९, २१-१३ असा पराभव केला. 

उपांत्य लढतीत आयुषला सुरुवातीला संघर्ष करावा लागला. वितिदसर्नने वेगवान आणि अचूक खेळाच्या जोरावर पहिल्या गेमला ४-० अशी आघाडी घेतली. गेमच्या मध्याला वितिदर्सन याने आघाडी ११-५ अशी भक्कम केली आणि त्यानंतर पहिला गेम सहज जिंकला. दुसर्‍या गेममध्ये मात्र आयुषने आत्मविश्वासाने खेळ केला. वितिदसर्नने गेममध्ये परतण्यासाठी प्रयत्न करताना पिछाडी १३-११ अशी भरून काढली. मात्र, आयुषने संयम ढळू दिला नाही आणि दुसरा गेम जिंकून सामना निर्णायक तिसर्‍या गेममध्ये नेला. तिसर्‍या गेममध्ये आयुषने आक्रमकता कायम ठेवताना खेळाला बचावाची सुरेख जोड दिली. त्यापुढे वितिदसर्न निष्प्रभ ठरला.

तब्बल ६१ वर्षांनंतर…

आशियाई स्पर्धेत यापूर्वी दिनेश खन्ना हे पुरुष एकेरीची अंतिम फेरी गाठणारे आणि विजेतेपद मिळविणारे पहिले भारतीय खेळाडू होते. खन्ना यांनी १९६५ मध्ये अशी कामगिरी केली होती. त्यानंतर एकही भारतीय खेळाडू ही कामगिरी करू शकला नाही. २०२३ मध्ये सा्त्विवक-चिराग जोडीने स्पर्धेत दुहेरीचे विजेतेपद मिळवले होते. एकेरीत मात्र भारताची प्रतीक्षा कायम होती. आयुषमुळे ती प्रतीक्षा संपली आहे.