Suryakumar Yadav Statement: गतविजेत्या भारतीय संघाला आयसीसी टी-२० वर्ल्डकप २०२६ स्पर्धेत जेतेपदासाठी प्रबळ दावेदार मानलं जात आहे. भारतीय संघाने गेल्या काही वर्षांत टी-२० क्रिकेटमध्ये जी कामगिरी केली आहे, ते पाहता भारतासाठी कुठलंही आव्हान मोठं नाही आणि कमीत कमी धावांचाही भारतीय गोलंदाज यशस्वी बचाव करू शकतात. पण अमेरिकेविरूद्धच्या सामन्यात भारतीय फलंदाजी ढेपाळली होती. या सामन्यात जर सूर्यकमार यादवने अर्धशतकी खेळी केली नसती, तर सामन्याचा निकाल कदाचित वेगळा असता. दरम्यान या सामन्यानंतर सूर्यकुमार यादव काय म्हणाला? जाणून घ्या.
या सामन्यातील शेवटच्या षटकापर्यंत सूर्यकुमार यादव खेळपट्टीवर टीकून होता. सूर्याने फलंदाजांना येताना आणि जाताना पाहिलं. पण त्याने एक बाजू धरून ठेवली आणि ४९ चेंडूत ८४ धावांची खेळी केली. भारतीय संघाच्या स्थितीबद्दल बोलताना सूर्यकुमार यादव म्हणाला, “ज्यावेळी संघाची धावसंख्या ६ बाद ७७ धावा अशी होती त्यावेळी माझ्यावर किती दडपण होतं, हे फक्त मीच सांगू शकतो. पण त्यावेळी माझ्या मनात एक विश्वास होता की, मी याआधीही अशा स्थितीत फलंदाजी केली आहे. मुंबईतील आझाद मैदान, क्रॉस मैदान अशा मैदानांवर मी भरपूर क्रिकेट खेळलो आहे, त्यामुळे मला माहीत होतं की मी शेवटपर्यंत खेळलो तर नक्कीच फरक पडू शकतो.”
तसेच तो पुढे म्हणाला की, “मला तरी हेच वाटतं की, सामना जिंकल्यानंतरही खूप काही शिकता येतं. आज झालेल्या सामन्यातून आम्ही हेच शिकलो की, आम्ही आणखी चांगली फलंदाजी करू शकलो असतो. एक- दोन फलंदाजांनी शेवटपर्यंत खेळण्यापेक्षा छोट्या- छोट्या भागीदाऱ्या केल्या असत्या तर आम्ही १६० धावांपर्यंत पोहोचलो असतो. आता आम्ही आरामात बसू, पुढच्या सामन्याआधी आमच्यातडे ५ दिवस आहेत. आम्ही अधिक जोमान पुनरागमन करू.”
तसेच या सामन्यानंतर बोलताना सूर्यकुमार यादवने वॉशिंग्टन सुंदर आणि जसप्रीत बुमराहच्या फिटनेसबाबतही अपडेट दिली आहे. तो म्हणाला, ““वॉशिंग्टन दिल्लीत आमच्यासोबत सामील होत आहे. तो ठीक आहे, सर्व काही व्यवस्थित आहे. बुमराहला हवामानातील बदलामुळे थोडा ताप होता, जसा अभिषेकलाही त्रास झाला होता. पण बाकी सर्व काही उत्तम आहे.”

