scorecardresearch

Premium

भारताची हार

न्यूझीलंडचा २-१ फरकाने विजय; बचाव फळीच्या चुकांचा फटका

भारताचा कर्णधार सरदारा सिंग
भारताचा कर्णधार सरदारा सिंग

न्यूझीलंडचा २-१ फरकाने विजय; बचाव फळीच्या चुकांचा फटका
कामगिरीतील सातत्याचा अभाव व भारतीय हॉकी संघ यांचे अतूट नाते आहे. पाकिस्तानला नमवणाऱ्या भारताला अझलन शाह चषक हॉकी स्पर्धेत बुधवारी न्यूझीलंडकडून १-२ असा पराभव पत्करावा लागला. या पराभवामुळे अंतिम फेरीत स्थान मिळवण्यासाठी भारताला मलेशियाविरुद्धच्या लढतीत विजय मिळवणे अनिवार्य आहे.
गतविजेत्या न्यूझीलंडकडून केन रसेल (२८ वे मिनिट) व निक विल्सन (४१ वे मिनिट) यांनी प्रत्येकी एक गोल केला. विल्सनने केलेल्या विजयी गोलमध्ये भारताच्या बचाव फळीतील खेळाडूंनी केलेल्या चुकांचा मोठा वाटा होता. भारताचा एकमेव गोल मनदीप सिंगने ३६व्या मिनिटाला केला. या सामन्यात शेवटची पाच मिनिटे बाकी असताना भारताने पेनल्टी कॉर्नरची संधी वाया घालवली. हा सामना बरोबरीत सुटला असता किंवा जिंकला असता तर भारताला अंतिम फेरीत स्थान मिळवता आले असते.
न्यूझीलंडने या सामन्यातील विजयासह साखळी गटात दुसरे स्थान मिळवले आहे. त्यांचे ११ गुण झाले आहेत, तर भारताच्या खात्यावर ९ गुण जमा आहेत.
भारताला २०व्या मिनिटाला पहिला पेनल्टी कॉर्नर मिळाला. मात्र भारताच्या रुपिंदरपाल सिंगने मारलेला फटका न्यूझीलंडचा गोलरक्षक डेव्हॉन मँचेस्टरने शिताफीने अडविला. दुसऱ्या बाजूने न्यूझीलंडनेही आक्रमक चाली केल्या. २८व्या मिनिटाला त्यांना पेनल्टी कॉर्नरची संधी लाभली. त्याचा फायदा घेत रसेल याने न्यूझीलंडचे खाते उघडले. त्याने मारलेला फटका भारताच्या मनप्रीतच्या स्टिकला लागून गोलमध्ये गेला. या गोलनंतर भारतीय खेळाडूंनी बरोबरीसाठी सतत चाली केल्या. अखेर ३६व्या मिनिटाला तलविंदर सिंगने दिलेल्या पासवर मनप्रीतने खणखणीत फटका मारून गोल केला. त्यानंतर चार मिनिटांनी भारताला गोल करण्याची आणखी एक संधी मिळाली होती. मात्र एस.व्ही.सुनीलला अचूकपणे फटका मारता आला नाही.
बचावफळीतील शिथिलतेचा फायदा घेत ४१व्या मिनिटाला न्यूझीलंडच्या विल्सन याने अप्रतिम गोल केला व संघाला २-१ अशी आघाडी मिळवून दिली. उत्तरार्धात भारतास दोन पेनल्टी कॉर्नर मिळाले, मात्र त्याचा लाभ घेण्यात त्यांना अपयश आले. या दोन संधींबरोबरच भारतीय खेळाडूंनी गोल करण्याच्या आणखी दोन ते तीन संधी वाया घालवल्या.

हॉकी इंडियाचे महाराष्ट्रातल्या दुष्काळासाठी १० लाख
नवी दिल्ली : महाराष्ट्रातल्या भीषण दुष्काळाचे वास्तव जाणत हॉकी इंडियाने मुख्यमंत्री निधीला १० लाख रुपये देण्याचा निर्णय घेतला आहे. ‘हे नैसर्गिक संकट भीषण असे आहे. दुष्काळाने होरपळणाऱ्या नागरिकांना मदत करणे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. तेच आम्ही करत आहोत. असंख्य शेतकरी आणि त्यांच्या कुटुंबियांचे दुष्काळामुळे अतोनात नुकसान झाले आहे. त्यांना सावरण्यासाठीच मदत देण्याचा निर्णय घेतला आहे’, असे हॉकी इंडियाचे सरचिटणीस आणि मोहम्मद मुश्ताक अहमद आणि मुख्य कार्यकारी अधिकारी एलेना नॉर्मन यांनी सांगितले.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व क्रीडा, वर्ल्डकप २०२३ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Azlan shah cup hockey india lose to new zealand now must beat malaysia to reach final

First published on: 14-04-2016 at 05:31 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×