Babar Azam Broke Virat Kohli World Record: पाकिस्तान आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तीन सामन्यांच्या टी-२० मालिकेतील शेवटचा सामना लाहोरच्या गद्दाफी स्टेडियमवर खेळला गेला. या सामन्यातही पाकिस्तानने ऑस्ट्रेलियावर मोठा विजय मिळवत टी-२० मालिका एकतर्फी जिंकली. या सामन्यात पाकिस्तानचा स्टार फलंदाज बाबर आझमने मोठी खेळी साकारली. या अर्धशतकी खेळीच्या जोरावर बाबर आझमने टी-२० इतिहासात थेट विराट कोहलीचा वर्ल्ड रेकॉर्ड मोडत पहिलं स्थान गाठलं आहे.

बाबर आझमला गेला बराच काळ त्याचा फॉर्म आणि खराब स्ट्राईक रेटमुळे ट्रोल केलं जात आहे. यादरम्यान बाबरने ऑस्ट्रेलियाविरूद्ध तिसऱ्या टी-२० सामन्यात अर्धशतक झळकावलं. पण, त्याचा स्ट्राईक रेट यादरम्यानही प्रश्नांच्या भोवऱ्यात राहिला. विराट कोहलीचा एक मोठा विक्रम यादरम्यान त्याने मोडला.

प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तानने बाबर आझमच्या नाबाद खेळीच्या बळावर २० षटकांत ६ गडी गमावून २०७ धावा केल्या. बाबरने ३६ चेंडूत ३ चौकार आणि १ षटकारासह ५० धावा केल्या. पण त्याने ही खेळी १३८.८८ च्या स्ट्राईक रेटने केली, जी टी-२० सामन्यात एका संघाने केलेल्या २००+ धावांपैकी तिसर सर्वात हळू अर्धशतक आहे. यापूर्वी, बाबरला मालिकेतील पहिल्या दोन सामन्यांमध्ये फक्त २ आणि २४ धावा करता आल्या होत्या, परंतु तिसऱ्या सामन्यात त्याने आपला फॉर्म परत मिळवला.’

बाबर आझमने अर्धशतकी खेळी करत इतिहास घडवला

बाबरचं हे त्याच्या टी-२० कारकिर्दीतील ३९वं अर्धशतक होतं, त्याने या विक्रमात भारताच्या विराट कोहलीला मागे टाकलं. बाबर आता टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक अर्धशतकं करणारा फलंदाज बनला आहे. बाबर यापूर्वी विराट कोहलीबरोबर संयुक्तपणे पहिल्या स्थानी होता. विराटने १२५ सामन्यांमध्ये ३८ अर्धशतकं झळकावली होती, तर बाबरने १३९ सामन्यांमध्ये ३९ अर्धशतकं झळकावली आहेत. यासह टी-२० इतिहासात सर्वाधिक अर्धशतकं करणारा बाबर आझम जगातील पहिला खेळाडू ठरला आहे.

सर्वाधिक अर्धशतकांच्या यादीत रोहित शर्मा ३२ अर्धशतकांसह तिसऱ्या क्रमांकावर आहे, मोहम्मद रिझवान ३० अर्धशतकांसह चौथ्या क्रमांकावर आहे आणि डेव्हिड वॉर्नर २८ अर्धशतकांसह पाचव्या क्रमांकावर आहे.

ऑस्ट्रेलियाविरूद्ध सामन्यात पाकिस्तानकडून सॅम अयुब आणि शादाब खान यांनीही दमदार खेळी केली. सॅम अयुबने ३७ चेंडूत ५६ धावा केल्या. दरम्यान, शादाब खानने १९ चेंडूत ४६ धावा केल्या, ज्यात दोन चौकार आणि पाच षटकारांचा समावेश होता. तर गोलंदाजीत मोहम्मद नवाजने ५ विकेट्स घेण्याचा पराक्रम केला.