Babar Azam Record: आयसीसी टी-२० वर्ल्डकप २०२६ स्पर्धेत आज होणाऱ्या सामन्यात भारत आणि पाकिस्तान हे दोन्ही संघ भिडणार आहेत. हा सामना कोलंबोतील आर. प्रेमदासा स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. या सामन्यात पाकिस्तानचा स्टार फलंदाज बाबर आझम हा पाकिस्तानसाठी एक्स फॅक्टर ठरू शकतो. हा सामना भारतीय वेळेनुसार संध्याकाळी ७ वाजता सुरू होणार आहे. तर नाणेफेक संध्याकाळी ६:३० वाजता होणार आहे.

पाकिस्तानचा स्टार फलंदाज बाबर आझम हा टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत अव्वल स्थानी आहे. बाबर आझमने आतापर्यंत १४१ सामन्यांमध्ये ३९.३६ च्या सरासरीने ४५६६ धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याने ३ शतकं आणि ३९ अर्धशतकं झळकावले आहेत. यादरम्यान १२२ धावा ही त्याची सर्वोत्तम कामगिरी आहे. आयसीसी टी-२० वर्ल्डकप २०२६ स्पर्धेतील सुरूवातीच्या दोन्ही सामन्यांमध्ये त्याने १५ आणि ४६ धावांची खेळी केली आहे.

सुरूवातीच्या दोन्ही सामन्यांमध्ये त्याला अपेक्षेप्रमाणे कामगिरी करता आलेली नाही. पण तरीदेखील त्याला भारतीय संघाविरूद्ध होणाऱ्या सामन्यात संधी दिली जाऊ शकते. पाकिस्तानला जर हा सामना जिंकायचा असेल, तर बाबर आझमने चांगली सुरूवात करून देणं गरजेचं असणार आहे. भारत आणि पाकिस्तान हे दोन्ही संघ टी-२० वर्ल्डकप स्पर्धेत ८ वेळा आमनेसामने आले आहेत. यादरम्यान पाकिस्तानला केवळ १ सामना जिंकता आला आहे. तर भारतीय संघाने ७ सामने जिंकले आहेत. ज्यावेळी पाकिस्तानने हा सामना जिंकला होता. त्यावेळी बाबर आझमने नाबाद अर्धशतकी खेळी केली होती. आता पाकिस्तानच्या चाहत्यांना पुन्हा एकदा बाबर आझमकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा असणार आहे.

भारताविरूद्ध कसा आहे बाबर आझमचा रेकॉर्ड?

बाबर आझमचा भारतीय संघाविरूद्ध खेळताना रेकॉर्ड हवा तितका खास राहिलेला नाही. बाबर आझमला भारतीय संघाविरूद्ध ५ टी-२० आंतरराष्ट्रीय सामने खेळण्याची संधी मिळाली आहे. यादरम्यान त्याने २६.२५ च्या सरासरीने अवघ्या १०५ धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याला १ अर्धशतक झळकावता आलं आहे. यादरम्यान नाबाद ६८ धावा ही त्याची सर्वोत्तम खेळी आहे. त्यावेळी त्याने ५२ चेंडूत ६८ धावांची खेळी केली. कोलंबोत बाबर आझम चांगली कामगिरी करणार का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.