Babar Azam Missed Test Century Run Out Trinidad: पाकिस्तान आणि वेस्ट इंडिज यांच्यातील कसोटी मालिकेतील दुसरा कसोटी सामना खेळवला जात आहे. त्रिनिदादमध्ये खेल्यात जात असलेल्या या दुसऱ्या कसोटी सामन्यात पाकिस्तान संघ वरचढ ठरत आहे. पाकिस्तानचा कसोटी कर्णधार भूमिकेत परतलेल्या बाबर आझमचं शतक अवघ्या काही धावांसाठी पुन्हा एकदा हुकलं. गेल्या ४ वर्षात पहिलं शतक करू पाहणाऱ्या बाबर आझमला धावबाद होत माघारी परतावं लागलं.

पाकिस्तानचा स्टार फलंदाज बाबर आझम याची कसोटी शतकाची प्रतीक्षा आणखी लांबली आहे. सहकारी फलंदाज अब्दुल्ला शफीकसोबत झालेल्या गोंधळामुळे तो शतकापासून अवघ्या १२ धावांनी दूर राहिला. वेस्ट इंडिजविरुद्ध सुरू असलेल्या दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेपूर्वी बाबरला पुन्हा पाकिस्तानचा कसोटी कर्णधार करण्यात आलं होतं. पोर्ट ऑफ स्पेन येथे खेळल्या जात असलेल्या दुसऱ्या कसोटीत तो १४७ चेंडूत ८८ धावांवर खेळत असताना एका धाव घेण्यासाठी धावला आणि त्याच क्षणी त्याची खेळी संपुष्टात आली.

७५व्या षटकातील जोमेल वॉरिकनच्या पाचव्या चेंडूवर बाबरने चेंडू ऑफ साइडला ढकलला आणि धाव घेण्यासाठी पळाला. कव्हरमधून ब्रँडन किंग वेगाने धावत आला आणि एका झटक्यात नॉन-स्ट्रायकर एंडकडे अचूक थ्रो केला. थ्रो करताना किंगला दुखापत झाल्याचं दिसलं आणि अखेर त्याला स्ट्रेचरवरून मैदानाबाहेर न्यावं लागलं, पण असं असतानाही त्याने संघाला मोठी विकेट मिळवून देत आपली कामगिरी चोख बजावली. वेस्ट इंडिजने पाकिस्तानवर चांगला दबाव निर्माण केला होता. त्यांनी क्षेत्ररक्षणात काटेकोरपणा राखत पाकिस्तानला सहज धावा करू दिल्या नाहीत.

या मालिकेत बाबरची फलंदाजी तुलनेने चांगली राहिली आहे. पहिल्या कसोटीपूर्वीच्या सराव सामन्यात त्याने शतक झळकावलं होतं, तर पहिल्या कसोटीच्या दुसऱ्या डावात त्याने नाबाद ५८ धावा करत आपला फॉर्म कायम राखला होता.

मंगळवारी बाबर आझमने केलेल्या ८८ धावा या डिसेंबर २०२२ मध्ये त्याने अखेरचं कसोटी शतक झळकावल्यानंतरची त्याची सर्वोच्च धावसंख्या ठरली. २०२२ मध्ये कराचीत न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या कसोटीच्या पहिल्या डावात बाबरने १६१ धावांची खेळी केली होती. सात कसोटी सामन्यांतील ते त्याचं तिसरं शतक होतं, मात्र त्यानंतर त्याला एकही कसोटी शतक झळकावता आलेलं नाही.

दुसऱ्या विकेटसाठी बाबर आणि अब्दुल्ला शफीक यांनी २३७ चेंडूत १८३ धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी उभी केली. बाबर बाद झाल्यानंतर पाकिस्तानने काही विकेट्स झटपट गमावल्या, पण एका टोकाकडून शफीकने १५० धावांचा टप्पा ओलांडत डाव सावरला आणि संघाच्या धावसंख्येला स्थैर्य दिलं. त्याच्या दमदार खेळीमुळे पाकिस्तानला आघाडी मिळवण्यात यश आलं.