Babar Azam Viral Video: पाकिस्तानचा सर्वात अनुभवी फलंदाज बाबर आझम सध्या पाकिस्तान संघातून बाहेर आहे. त्यामुळे तो पाकिस्तानातील देशांतर्गत क्रिकेटमधील एक सामना खेळण्यासाठी मैदानात उतरला होता. पण त्याला क्रिकेट खेळताना पाहण्याऐवजी क्रिकेट पाहण्यासाठी आलेले चाहते थेट मैदानात घुसले आणि त्याच्यासोबत सेल्फी घेण्याचा प्रयत्न करू लागले. हे बाबर आझमला मुळीच आवडलं नाही. त्यामुळे वैतागून त्याने रागात चाहत्यांचा मोबाईल फेकल्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

पाकिस्तानात प्रेसिडेंट ट्रॉफीतील ग्रेड १ च्या सामन्यादरम्यान सामना पाहण्यासाठी आलेले प्रेक्षक थेट मैदानात घुसले. डायमंड क्रिकेट ग्राऊंडवर सुरू असलेल्या या सामन्यात जेव्हा २ क्रिकेट चाहते मैदानात घुसले. त्यावेळी बाबर आझमने एका चाहत्याचा फोन रागात हिसकावून घेतला आणि फेकून दिला. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होऊ लागला आहे. व्हिडीओ व्हायरल होताच, बाबर आझमला ट्रोल केलं जाऊ लागलं आहे.

बाबर आझम हा ७ वर्षांनंतर देशांतर्गत क्रिकेट खेळण्यासाठी मैदानात उतरला आहे. प्रेसिडेंट ट्रॉफी ग्रेड -१ मध्ये एकूण ८ संघांनी सहभाग घेतला आहे. या स्पर्धेत तो ऑईल आणि गॅस डेव्हलपमेंट कंपनी लिमिटेड या संघाचं प्रतिनिधित्व करत आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये प्रोटोकॉलमुळे चाहत्यांना त्याच्या इतक्या जवळ जाण्याची संधी मिळत नाही. या लोकल स्पर्धेत संधी मिळाल्याने चाहते सतत मैदानात घुसून त्याच्याकडे सेल्फीची मागणी करत आहेत. चिंता वाढवणारी बाब अशी की, आंतरराष्ट्रीय खेळाडू खेळत असताना आजूबाजूला एकही सुरक्षारक्षक नाही.

या सामन्यातील पहिल्या दिवशीही २ चाहते सेल्फी घेण्यासाठी मैदानात घुसले होते. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, काही चाहते हातात फोन घेऊन बाबर आझमच्या दिशेने जाताना दिसून येत आहेत. त्यावेळी बाबर आझमने त्याला धक्का दिला आणि मैदानाबाहेर जायला सांगितलं. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून नेटकऱ्यांनी बाबर आझमला ट्रोल केलं आहे.