पाकिस्तान संघ आणि वादविवाद नवीन नाहीत. पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमला ट्रोलर्सनी लक्ष्य केलं आहे. पाकिस्तानच्या संघाने नुकतंच ब्रिटनचे राजे किंग चार्ल्स यांची भेट घेतली. यावेळी बाबरचा लूक पाहिल्यानंतर सोशल मीडियावर त्याला ट्रोल करण्यात येत आहे.

शिष्टाचाराचा भाग म्हणून पाकिस्तानच्या संघाने ब्रिटनचे राजे किंग चार्ल्स यांची भेट घेतली. या सोहळ्यासाठी बाबर ज्या कपड्यात आला होता आणि त्याच्या केसांचा रंग यामुळे त्याला जोरदार ट्रोल केलं जात आहे. याआधीही बाबरला लूक्सवरून ट्रोल करण्यात आलं आहे.

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हीडिओत बाबर टीम बसमधून उतरताना दिसत आहे. त्याने पांढरा रंगाचा शर्ट आणि निळ्या रंगाची जीन्स असे कपेड परिधान केले आहेत.

इंग्लंड दौऱ्यात दोन कसोटीत दारुण पराभवानंतर पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने ७ खेळाडूंना मायदेशी धाडलं. याव्यतिरिक्त प्रशिक्षकांनाही नारळ दिला आहे. वनडे आणि टी२०चे प्रशिक्षक माईक हेसन यांना संघाची सूत्रं स्वीकारण्याचा आदेश देण्यात आला आहे. निवडसमिती सदस्य आणि माजी कर्णधार मिसबाह उल हक यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. संबंधित देशातील सगळ्यात मोठ्या पदावरील किंवा राजघराण्याशी संबंधित व्यक्तीला भेटताना असे कॅज्युअल कपडे परिधान केल्याने बाबरवर टीका होते आहे.

कपड्यांच्या बरोबरीने बाबरला केसांसाठी ट्रोल केलं जात आहे. व्हीडिओत बाबरचे केस एकदम काळे दिसत आहेत आणि त्यांना चकाकी आहे. केस सेट करण्यासाठी त्याने खूप वेळ घेतल्याचं स्पष्ट होत आहे. नेटकऱ्यांनी सोशल मीडियावर बाबरची खिल्ली उडवायला सुरुवात केली. ब्रिटनच्या राजेंना भेटण्यासाठी १५ रुपयांचा स्वस्तातला हेअर डाय लावून जातोस का मित्रा अशी विचारणा काही नेटकऱ्यांनी केली आहे.

एकीकडे बाबरच्या लूकची टिंगल उडवली जात आहे. दुसरीकडे त्याची तब्येत नीट नसल्याच्या बातम्या समोर येत आहेत. मालिकेतल्या तिसऱ्या कसोटीपूर्वी बाबरला ताप भरला आहे. पाकिस्तान संघातील वैद्यकीय चमू त्याची काळजी घेत आहे. बाबर तिसऱ्या कसोटीसाठी फिट न झाल्यास पाकिस्तान संघाच्या अडचणीत वाढ होऊ शकते. पहिल्या कसोटीत बाबर दुखापतीमुळे खेळू शकला नव्हता. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने दुसऱ्या कसोटीनंतर संघात घाऊक बदल केले आहेत. समाविष्ट खेळाडूंपैकी पाचजणांनी अद्याप पदार्पण देखील केलेले नाही. बाबर फिट होऊ न शकल्यास कर्णधार कोण हा एक मोठाच प्रश्न पाकिस्तान संघव्यवस्थापनासमोर आहे.