आंतरराष्ट्रीय कुस्तीगीर बबिता कुमारी, अमितकुमार दहिया व बजरंग यांची भारतीय कुस्ती महासंघाने यंदाच्या अर्जुन पुरस्कारासाठी शिफारस केली आहे.
आंतरराष्ट्रीय स्तरावर कुस्तीमध्ये कौतुकास्पद कामगिरी करणाऱ्या फोगट भगिनींपैकी बबिताने गतवर्षी ५५ किलो गटात अनेक स्पर्धामध्ये पदकांची लयलूट केली आहे. तिने ग्लासगो येथे राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत सोनेरी कामगिरी केली होती. अमितने २०१२ च्या ऑलिम्पिकमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले होते. या स्पर्धेत सहभागी झालेला तो भारताचा सर्वात तरुण मल्ल होता. त्याने २०१३ च्या जागतिक स्पर्धेत रौप्यपदक तर गतवर्षी राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक  मिळविले होते. बजरंग याने राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत रौप्यपदक मिळविले होते. तसेच त्याने आशियाई व जागतिक स्पर्धेत कांस्यपदक मिळविले आहे.

फुटबॉलसाठी चौघांची शिफारस
अखिल भारतीय फुटबॉल संघटनेने या पुरस्कारासाठी भारतीय संघातील निवृत्त खेळाडू क्लिमेक्स लॉरेन्स व महेश गवळी यांच्याबरोबरच सध्याच्या भारतीय संघातील सुब्रतो पॉल व ओईनाम बेमबेम देवी यांची शिफारस केली आहे.