करोनाच्या भीतीमुळे गेले तीन-चार महिने बंद असलेले क्रिकेट आता हळूहळू पूर्वपदावर येत आहे. ८ जुलैपासून वेस्ट इंडिज आणि इंग्लंड यांच्यात कसोटी क्रिकेटची सुरूवात होणार आहे. पाकिस्तानचा क्रिकेट संघदेखील रविवारी इंग्लंडला तीन सामन्यांच्या कसोटी आणि तीन सामन्यांच्या टी-२० मालिकेसाठी रवाना झाला. पण भारतीय क्रिकेट संघाला आणि चाहत्यांना मात्र अजून वाट पाहावी लागणार आहे. कारण ऑगस्ट महिन्याच्या आधी प्रशिक्षण शिबीर सुरू केले जाणार नाही असे भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (BCCI) कडून सांगण्यात येत आहे.

BCCI अध्यक्ष सौरव गांगुली याने भारतीय संघातील खेळाडूंसाठी महत्त्वाची अपडेट दिली. टीम इंडियाचे प्रशिक्षण शिबीर ऑगस्ट महिन्याच्या आधी सुरू होणार नसल्याचे गांगुली म्हणाला असल्याचे वृत्त एबीपी न्यूजने दिले. या वृत्तानंतर चाहतेही नाराज झाल्याचे बोलले जात आहे. क्रिकेटपटू आणि चाहते सध्या भारतीय संघाला मैदानावर बघण्यासाठी उत्सुक आहेत. मात्र भारताचे आगामी दोन दौरे रद्द करण्यात आले आहेत. श्रीलंका आणि झिम्बाब्वे असे दोन दौरे भारतीय संघ करणार होता, पण करोनाचे कारण सांगत BCCI ने त्या दोन दौऱ्यांवर फुली मारली. त्यानंतर आता ऑगस्टच्या आधी प्रशिक्षण शिबीर सुरू होणार नाही असेही सांगण्यात येत आहे. पण संघ नक्की मैदानावर कधी उतरणार हे मात्र सांगितले गेलेले नाही.

करोना व्हायरसमुळे उद्भवलेला धोका लक्षात घेता भारतीय क्रिकेट संघ श्रीलंका आणि झिम्बाब्वे दौऱ्यावर जाणार नसल्याचे भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) जाहीर केले. भारतीय संघ २४ जून जूनपासून श्रीलंका दौऱ्यात तीन एकदिवसीय आणि तीन टी २० मालिका खेळणार होता. तर त्यानंतर २२ ऑगस्टपासून नियोजित असलेल्या झिम्बाब्वे दौऱ्यात तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेचा समावेश होता. हे दौरे लांबणीवर टाकण्यात येतील अशी शक्यता आधी व्यक्त करण्यात येत होती. पण आता BCCI ने हे दोनही दौरे थेट रद्द करण्यात आले आहेत. मात्र, भारताच्या काही खेळाडूंना वैयक्तिक स्तरावर मैदानात सराव सुरू केला आहे.