निंगबो (चीन) : आशिया अजिंक्यपद बॅडमिंटन स्पर्धेत दुसर्‍या दिवशी बुधवारी भारताला संमिश्र यशावर समाधान मानावे लागले. लक्ष्य सेन याच्यासह अनुभवी किदम्बी श्रीकांतने सलामीलाच आव्हान गमावले. दोन वेळची ऑलिम्पिक पदकविजेती पीव्ही सिंधू, एचएस प्रणॉय आणि आयुष शेट्टी यांनी यशस्वी सुरुवात करताना उपउपांत्यपूर्व फेरीत प्रवेश मिळवला. आयुषने जागतिक क्रमवारीत सातव्या स्थानी असलेल्या चीनच्या लिन शी फेंगला पराभवाचा धक्का दिला. 

सिंधूने मलेशियाच्या वाँग लिंग चिंगचा १५-२१, २१-११, २१-१९ असा पराभव केला. तत्पूर्वी, आयुष शेट्टीने ली शी फेंगचा २१-१३, २१-१६ असा सरळ गेममध्ये पराभव केला. प्रणॉयने जानेवारीनंतर आपला पहिला विजय मिळवताना व्हिएतनामच्या एन्गुयेन है डांगला २४-२२, २१-१२ असे नमवले.

पुरुष एकेरीतच लक्ष्य सेनला हाँगकाँगच्या ली चेऊक यू याच्याविरुद्ध १२-२१, १९-२१ असा पराभव पत्करावा लागला. श्रीकांत सिंगापूरच्या माजी जगज्जेत्या लोह कीन यू याच्याकडून २१-१८, ९-२१, ११-२१ अशा फरकाने पराभूत होऊन स्पर्धेबाहेर पडला.

महिलांमध्ये मालविका बनसोडला थायलंडच्या बुसानन ओंगबाम्रुन्गफान हिच्याकडून १०-२१, १९-२१ असा पराभव पत्करावा लागला. तन्वी शर्मावर मलेशियाच्या लेट्शन्ना कारुपाथेवनने १९-२१, १४-२१ अशी मात केली. उन्नती हुडाने आपला खेळ उंचावत थायलंडच्या सुपानिदा काटेथाँग हिचा संघर्षपूर्ण लढतीत २३-२५ २१-१८, २१-१८ असा पराभव केला.

भारतीय पुरुष नेमबाजांकडून निराशा

ग्रनाडा (स्पेन) : विश्वचषक नेमबाजी स्पर्धेत बुधवारी १० मीटर एअर पिस्तूल प्रकारात भारतीय पुरुष नेमबाजांनी निराशाजनक कामगिरी केली. महिलांच्या २५ मीटर पिस्तूल प्रकारात मात्र भारताचे आव्हान कायम आहे. रिदम सांगवान हिच्यासह तिघींनी समाधानकारक कामगिरी केली. १० मीटर एअर पिस्तूल प्रकारात पुरुषांमध्ये युवा नेमबाज मुकेश नेलावल्ली ५७९ गुणांसह १४व्या स्थानावर राहिला. उज्ज्वल मलिक २२व्या, प्रमोद ३९व्या स्थानावर राहिला.

राष्ट्रकुल शिष्टमंडळ अहमदाबादमध्ये अहमदाबाद : २०३०मध्ये अहमदाबाद येथे होणार्‍या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी ‘राष्ट्रकुल क्रीडा महासंघा’चे शिष्टमंडळ भारतात आले असून, त्यांच्या चार दिवसांच्या आढावा दौर्‍यास बुधवारी सुरुवात झाली. हे शिष्टमंडळ खेळांसाठी प्रस्तावित असलेल्या महत्त्वाच्या ठिकाणांची पाहणी करेल. यामध्ये वीर सावरकर क्रीडा संकुल, नरेंद्र मोदी स्टेडियम, ‘एका’ अरिना, बडोदा क्रिकेट स्टेडियम आणि एकता नगर येथील ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’ यांचा समावेश आहे.