पीटीआय, नवी दिल्ली पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत बॅडमिंटनमध्ये अपयशी ठरलेल्या भारताच्या महिला दुहेरीच्या जोडीतील एक खेळाडू अश्विनी पोनप्पाने ऑलिम्पिकसाठी आपल्याला कुठलीही आर्थिक मदत सोडा, आमची प्रशिक्षकाची मागणी देखील स्वीकारली गेली नव्हती, अशी टीका भारतीय क्रीडा प्राधिकरणावर (साइ) केली आहे. तनिषा कॅस्ट्रोच्या साथीत महिला दुहेरी खेळणाऱ्या अश्विनी पोनप्पाला एकही लढत जिंकता आली नव्हती. ऑलिम्पिकसाठी खेळाडूंना केलेल्या आर्थिक मदतीत अश्विनीला ‘टॉप्स’ योजनेतंर्गत ४ लाख ५० हजार आणि प्रशिक्षण व विविध स्पर्धेसाठी वर्षभरात १ कोटी ४८ लाख रुपये देण्यात आल्याची माहिती ‘साइ’कडून देण्यात आली आहे. ‘‘ही माहिती पाहून आपल्याला धक्का बसला आहे. मला कुठलीही आर्थिक मदत मिळालेली नाही आणि जे काही दीड कोटी खर्च झाल्याचे बोलले जात आहे, ते सर्व राष्ट्रीय शिबिरावर खर्च झाले आहेत’’, असे अश्विनी म्हणाली. हेही वाचा >>>Vinesh Phogat : विनेश फोगटची प्रतीक्षा पुन्हा वाढली… आता रौप्यपदकासाठीचा क्रीडा लवादाचा निर्णय ‘या’ दिवशी येणार ‘‘माझ्याकडे विशेष प्रशिक्षक नाही. माझ्या वैयक्तिक प्रशिक्षकासाठी मी स्वत: पैसे खर्च करत आहे. मी कुणाकडूनही पैसे घेत नाही. नोव्हेंबर २०२३ पर्यंत आम्ही स्वत:हून खेळलो. ऑलिम्पिकसाठी पात्र ठरल्यानंतर आमचा ‘टॉप्स’मध्ये समावेश करण्यात आला. त्यानंतर आम्ही वैयक्तिक प्रशिक्षकाची मागणी केली होती. मात्र, त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले,’’ असेही अश्विनीने सांगितले. बॅडमिंटनमधील अपयशानंतर विशेषत: लक्ष्य सेन पदकापासून वंचित राहिल्यावर भारतीय संघाचे प्रेरक प्रकाश पदुकोण यांनी सरकारकडून सर्व मदत, सोयीसुविधा सहजपणे उपलब्ध झाल्यावर खेळण्याची आणि यशापयशाची जबाबदारी खेळाडूने उचलायला हवी, असा खेळाडूंचा समाचार घेतला होता. तेव्हादेखील अश्विनीने खेळाडूंनी कशासाठी जबाबदारी स्वीकारायची असे प्रत्युत्तर दिले होते. मात्र, त्याचवेळी तिची एकेकाळची दुहेरीतील जोडीदार ज्वाला गुट्टाने खेळाडूने जबाबदारी घ्यायलाच हवी. शेवटी मैदानावर ते खेळत असतात, असे मत मांडले होते.