जर्मनीत अडकलेले बॅडमिंटनपटू भारतात परतले

करोनाग्रस्ताच्या संपर्कात आल्याने सर्व भारतीय खेळाडूंचे सारलॉरलक्स खुल्या बॅडमिंटन स्पर्धेतील आव्हान सक्तीने संपुष्टात आले होते.

(संग्रहित छायाचित्र)
करोना चाचण्या नकारात्मक आल्यामुळे गतविजेत्या लक्ष्य सेनसहित भारतीय बॅडमिंटनपटूंचे पथक जर्मनीहून भारतात परतले आहे. करोनाग्रस्ताच्या संपर्कात आल्याने सर्व भारतीय खेळाडूंचे सारलॉरलक्स खुल्या बॅडमिंटन स्पर्धेतील आव्हान सक्तीने संपुष्टात आले होते.

वडील आणि प्रशिक्षक डी. के. सेन यांची करोना चाचणी सकारात्मक आल्यानंतर लक्ष्यचे जेतेपद टिकवण्याचे स्वप्न धुळीस मिळाले होते. जागतिक क्रमवारीत १३व्या स्थानावर असलेला अजय जयराम आणि २०१८ मधील विजेता शुभंकर डे यांनी जर्मनीच्या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी निधी उभारला होता. स्पर्धेआधी लक्ष्य, जयराम, डे आणि फिजिओ अभिषेक वाघ यांच्या करोना चाचणीचा अहवाल नकारात्मक आला होता.

‘‘आम्ही पहाटे पाच वाजता बेंगळूरुच्या निवासस्थानी पोहोचलो आहोत. सर्वाची प्रकृती उत्तम आहे. पहिली कोविड चाचणी सकारात्मक आल्यानंतर आमचे विलगीकरण करण्यात आले. १ नोव्हेंबरला आम्हा पाचही जणांच्या दुसऱ्यांदा घेण्यात आलेल्या चाचण्या नकारात्मक आल्या,’’ असे डी. के. सेन यांनी सांगितले. डे आणि जयराम फ्रँकफर्टहून थेट दिल्लीला पोहोचले आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Badminton players stranded in germany return to india abn