Lungi Ngidi Clean Bowled Nicholas Pooran: आयपीएल स्पर्धेत २०२६ स्पर्धेतील पाचवा सामना दिल्ली कॅपिटल्स आणि लखनौ सुपर जायंट्स या दोन्ही संघांमध्ये सुरू आहे. या सामन्यात दिल्ली कॅपिटल्स संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय दिल्लीच्या गोलंदाजांनी सार्थ ठरवला. लखनौ सुपर जायंट्स संघाचा डाव अवघ्या १४१ धावांवर आटोपला. पहिल्याच सामन्यात लखनौ सुपर जायंट्स संघातील अनुभवी फलंदाज निकोलस पूरन स्वस्तात माघारी परतला. निकोलस पूरन मोठे फटके खेळण्यासाठी ओळखला जातो. पण पहिल्याच सामन्यात लुंगी एन्गिडीने त्याला अप्रतिम चेंडू टाकून त्रिफळाचित करत माघारी धाडलं आहे.

प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या लखनौ सुपर जायंट्स संघाला हवी तशी सुरुवात करता आली नव्हती. ऋषभ पंत, एडन मारक्रम स्वस्तात माघारी परतले. त्यानंतर निकोलस पूरनकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा होती. पण तो देखील लवकर बाद होऊन माघारी परतला. दिल्लीकडून ९ वे षटक टाकण्यासाठी लुंगी एन्गिडी गोलंदाजीला आला. या षटकातील पाचव्या चेंडूवर तो त्रिफळाचित होऊन माघारी परतला.

लुंगी एन्गिडीने राऊंड द विकेटचा मारा करताना निकोलस पूरनच्या पॅड लाइनवर चेंडू टाकला. या चेंडूची गती खुप कमी होती. त्यामुळे निकोलस पूरनला चेंडूच्या गतीचा अंदाज आला नाही. त्याची बॅट पॅडमध्ये अडकली आणि चेंडू जाऊन यष्टीला आदळला. त्यामुळे निकोलस पूरनचा डाव अवघ्या ८ धावांवर आटोपला. लुंगी एन्गिडीने टाकलेल्या या चेंडूला ‘बॉल ऑफ आयपीएल २०२६’ असं म्हटलं जात आहे.

लखनौ सुपर जायंट्सचा पहिला डाव

दिल्ली कॅपिटल्सने नाणेफेक जिंकून लखनौला प्रथम फलंदाजी करण्याचे आमंत्रण दिले होते. लखनौकडून सलामीला आलेल्या मिचेल मार्शने ३५ धावांची खेळी करून दमदार सुरुवात करून दिली. पण त्यानंतर विकेट्सची रांग लागली. ऋषभ पंत ७, एडन मारक्रम ११, आयुष बदोनी ०, निकोलस पूरन ८ धावा करून माघारी परतला. तर अब्दुल समदने ३६ तर शाहबाज अहमदने १५ धावांची खेळी करून संघाची धावसंख्या १४० पार पोहोचवली. पण १४१ धावांवर संघाचा संपूर्ण डाव आटोपला. दिल्लीकडून गोलंदाजी करताना लुंगी एन्गिडी आणि टी नटराजन यांनी प्रत्येकी ३-३ गडी बाद केले. तर कुलदीप यादवने २ अक्षर पटेलने १ गडी बाद केला.