पॅरिस : फुटबॉलविश्वात प्रतिष्ठेच्या मानल्या जाणाऱ्या बॅलन डी’ओर पुरस्काराची नामांकन यादी जाहीर करण्यात आली असून २००३ सालानंतर प्रथमच लिओनेल मेसी आणि ख्रिास्तियानो रोनाल्डो यांना त्यात स्थान मिळालेले नाही.गेली दोन दशके मेसी आणि रोनाल्डो यांनी या पुरस्कारावर वर्चस्व गाजवले होते. गतविजेत्या मेसीने विक्रम आठ वेळा, तर रोनाल्डोने पाच वेळा बॅलन डी’ओर पुरस्कार आपल्या नावे केला आहे. मात्र, यंदा ३० खेळाडूंच्या यादीतून या दोघांनाही वगळण्यात आले आहे. २८ ऑक्टोबरला होणाऱ्या विशेष सोहळ्यात बॅलन डी’ओर पुरस्कार प्रदान केला जाईल. गतहंगामात चॅम्पियन्स लीग आणि ला लिगा जिंकणाऱ्या स्पॅनिश क्लब रेयाल माद्रिदमधील ज्युड बेलिंगहॅम, फेडेरिको वाल्वर्डे, टोनी क्रूस, व्हिनिशियस ज्युनियर, डॅनी कार्वाहाल आणि अॅन्टोनियो रुडिगर यांना या पुरस्कारासाठी मानांकन मिळाले आहे. युरो स्पर्धा जिंकणाऱ्या स्पेन संघातही कार्वाहालचा समावेश होता.स्पेनच्या जेतेपदात महत्त्वाची भूमिका बजावणारे निको विल्यम्स (अॅथलेटिक क्लब), डॅनी ओल्मो (बार्सिलोना), रॉड्री (मँचेस्टर सिटी), लेमिन यमाल (बार्सिलोना) यांनाही या यादीत स्थान मिळाले आहे. आता रेयाल माद्रिदकडून खेळणारा आणि फ्रान्सचे कर्णधार भूषवणारा किलियन एम्बापेही या यादीत आहे. हेही वाचा >>>Duleep Trophy 2024: मुशीर खानचे दुलीप ट्रॉफीमध्ये शानदार शतक, भाऊ सर्फराज खानच्या प्रतिक्रियेने वेधले लक्ष, पाहा VIDEO तसेच इंग्लिश क्लब मँचेस्टर सिटी आणि आर्सेनल यांच्यातील प्रत्येकी चार खेळाडूंना नामांकन मिळाले आहे. सिटी संघातील रॉड्रीसह अर्लिंग हालँड, रुबेन डियाझ, फिल फोडेन, तर आर्सेनलमधील बुकायो साका, डेक्लन राईस, मार्टिन ओडेगार्ड आणि विलियम सलिबा हे पुरस्काराच्या शर्यतीत असतील. त्याच प्रमाणे गतहंगामात अपराजित राहून जर्मनीतील बुंडसलिगा स्पर्धेचे जेतेपद पटकावणाऱ्या बायर लेव्हरकूसेन संघातील फ्लोरियन विर्ट्झ, ग्रानिट झाका आणि अॅलेक्स ग्रिमाल्डो यांनाही या यादीत स्थान मिळाले आहे. नामांकन मिळालेल्या अन्य खेळाडूंमध्ये कोल पाल्मर (इंग्लंड/चेल्सी), हॅरी केन (इंग्लंड/बायर्न म्युनिक), एमिलियानो मार्टिनेझ (अर्जेंटिना/अॅस्टन व्हिला), लौटारो मार्टिनेझ (अर्जेंटिना/इंटर मिलान), आर्टेम डोव्हबिक (युक्रेन/एएस रोमा), मॅट्स हुमल्स (जर्मनी/बोरुसिया डॉर्टमंड), व्हिटिनिया (पोर्तुगाल/ पॅरिस सेंट-जर्मेन), हकान चालोनोग्लू (तुर्की/इंटर मिलान) आणि अॅडेमोला लुकमन (नायजेरिया/अटलांटा) यांचा समावेश आहे.