BAN vs PAK 2nd Test Highlights in Marathi: पाकिस्तानला बांगलादेशविरूद्ध लाजिरवाण्या मालिका पराभवाला सामोरं जावं लागलं आहे. दोन सामन्यांच्या कसोटीत मालिकेत बांगलादेशने २-० ने मालिकेत निर्भेळ विजय मिळवला आहे. दुसऱ्या कसोटीतही बांगलादेशचा संघ सातत्याने आघाडीवर होता, पाकिस्तानकडून दुसऱ्या डावात मोहम्मद रिझवानने कडवी झुंज दिली, पण बांगलादेशच्या गोलंदाजीपुढे पाकिस्तानने गुडघे टेकले आणि दुसरा कसोटी सामना ७८ धावांनी गमावला.
दुसरा कसोटी सामना सिल्हेटमध्ये खेळवला गेला. या सामन्याची नाणेफेक पाकिस्तानने जिंकत प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आणि बांगलादेशला फलंदाजीसाठी पाचारण केलं. बांगलादेशने पहिल्या डावात २७८ धावा केल्या, तर पाकिस्तानचा संघ प्रत्युत्तरात २३२ धावांवर सर्वबाद झाला. यानंतर बांगलादेशने ४६ धावांची आघाडी घेतली आणि तिसऱ्या डावात ३९० धावा केल्या. म्हणजेच पाकिस्तानला विजयासाठी एकूण ४३६ धावांचं आव्हान दिलं. जे पाकिस्तान पूर्ण करण्यात अपयशी ठरला. दुसऱ्या डावात तैजुल इस्लामने ६ विकेट्स घेत पाकिस्तान संघावर चांगलाच भारी पडला.
बांगलादेशने केला पाकिस्तानचा लाजिरवाणा पराभव
दुसऱ्या कसोटीच्या अंतिम दिवशी, पाकिस्तानला विजयासाठी १२१ धावांची गरज होती आणि संघाकडे ३ विकेट्स शिल्लक होत्या. दिवसाच्या पहिल्या सत्रात रिझवान आणि साजिद खान यांनी आठव्या विकेटसाठी ५० धावांची भक्कम भागीदारी रचली. पाकिस्तानचा संघ या भागीदारीमुळे मजबूत स्थितीत सरकत होता. पण बांगलादेशचा गोलंदाज तैजुल इस्लामने साजिद खानला बाद करून ही भागीदारी तोडली.
पुढच्याच षटकात, आपले चौथं कसोटी शतक आणि घरच्या मैदानाबाहेरील पहिलं शतक करण्याच्या उंबरठ्यावर असलेला मोहम्मद रिझवान शरीफुल इस्लामच्या गोलंदाजीवर बाद झाला. त्यानंतर तैजुल इस्लामने पाकिस्तानच्या खुर्रम शहजादला बाद करत बांगलादेशच्या विजयावर शिक्कामोर्तब केला.
बांगलादेशने दिलेल्या ४३७ धावांना प्रत्युत्तर देताना, पाकिस्तानचा संघ आपल्या दुसऱ्या डावात ३५८ धावांवर गारद झाला आणि ७८ धावांनी सामना गमावला. पाकिस्तानकडून मोहम्मद रिझवानने १६६ चेंडूंमध्ये ९४ सर्वाधिक धावा केल्या, तर कर्णधार शान मसूद आणि सलमान आघा यांनी प्रत्येकी ७१ धावा केल्या. मात्र, या खेळींमुळे संघाला विजय मिळवता आला नाही. तैजुल इस्लाम बांगलादेशसाठी सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला, त्याने एकट्याने पाकिस्तानच्या निम्म्या संघाला माघारी धाडलं. त्याने ३४.२ षटकांत १२० धावा देऊन ६ बळी घेतले.
तत्पूर्वी बांगलादेशने पहिल्या डावात लिटन दासच्या १६ चौकार व २ षटकारांसह केलेल्या १२६ धावांच्या खेळीच्या बळावर २८७ धावांचा डोंगर उभारला. तर दुसऱ्या डावात बांगलादेशकडून मुशफिकूर रहीमने २ चौकार व एका षटकारासह १३७ धावांची खेळी केली. तर लिटन दासने ६९ धावांची खेळी केली. या खेळीच्या बळावर बांगलादेशने ३९० धावा केल्या.
