Bangladesh Cricket Board On ICC Decision: आयसीसी टी-२० वर्ल्डकप २०२६ स्पर्धा सुरू व्हायला अवघे काही दिवस शिल्लक राहिले आहेत. ही स्पर्धा भारत आणि श्रीलंकेत संयुक्तरित्या खेळवली जाणार आहे. स्पर्धेतील पहिला सामना ७ फेब्रुवारीला खेळवला जाईल. पण बांगलादेश क्रिकेट बोर्डने, बांगलादेशचा संघ ही स्पर्धा खेळण्यासाठी भारतात येणार नाही असं बजावून सांगितलं आहे. पण आयसीसीने ही मागणी फेटाळून लावली आहे. पण बांगलादेश क्रिकेट बोर्डला अजूनही असं वाटतंय की, निर्णय आपल्याच बाजूने लागू शकतो.

आयसीसी टी-२० वर्ल्डकप स्पर्धेतील सामने भारत आणि श्रीलंकेत खेळवले जाणार आहेत. पाकिस्तानने आधीच भारतात येण्यास नकार दिला आहे. त्यामुळे पाकिस्तानचे सर्व सामने श्रीलंकेत खेळवले जाणार आहेत. बांगलादेशमध्ये हिंदूंवर झालेल्या अत्याचारानंतर सध्या तणावाचं वातावरण आहे. त्यामुळे बांगलादेशच्या खेळाडूंनीही ही स्पर्धा खेळण्यासाठी भारतात येण्यास नकार दिला आहे. बांगलादेशचे सामने भारताबाहेर खेळवण्यात यावे अशी मागणी बांगलादेश क्रिकेट बोर्डकडून केली जात आहे. पण आयसीसीने ही मागणी फेटाळून लावली आहे. आयसीसीने ही अट मान्य करा किंवा स्पर्धेतून माघार घ्या, यावर विचार करण्यासाठी बांगलादेश क्रिकेट बोर्डला २४ तासांचा अल्टीमेटम दिला होता.

आयसीसीने घेतलेल्या निर्णयानंतर बांगलादेश क्रिकेट बोर्डचे अध्यक्ष अमीनुल इस्लाम बुलबुल यांनी म्हटले की, “बांगलादेश संघाला वर्ल्डकप तर खेळायचा आहे, पण भारतात नाही.” बांगलादेश क्रिकेट बोर्डकडून हे स्पष्ट करण्यात आलं आहे की, ते आपल्या भूमिकेवर ठाम राहून आयसीसीसोबत चर्चा करणं सुरू ठेवणार आहेत.

अमीनुल इस्लाम म्हणाले, ” आयसीसीने बांगलादेशचे सामने दुसऱ्या देशात खेळवण्याची मागणी फेटाळून लावली आहे. जागतिक क्रिकेटच्या स्थितीबद्दल आम्हाला खात्री नाही, कारण त्याची लोकप्रियता आता कमी होऊ लागली आहे. त्यांनी २० कोटी लोकांना क्रिकेटपासून दूर केले आहे. क्रिकेटचा आता ऑलिम्पिकमध्ये समावेश करण्यात आला आहे. पण जर आमच्यासारखा देश तिथे पोहोचू शकला नाही, तर हे आयसीसीचे अपयश आहे.”

तसेच ते पुढे म्हणाले की, “आमचे सामने श्रीलंकेत खेळवण्यात यावे, ही मागणी घेऊन आम्ही पुन्हा एकदा आयसीसीकडे जाणार आहोत. त्यांनी आम्हाला निर्णय घेण्यासाठी २४ तासांचा अल्टीमेटम दिला होता. परंतु कुठलीही जागतिक संस्था असं वागू शकत नाही. आयसीसीमुळे २० कोटी लोकं विश्वचषक पाहण्यापासून मुकतील आणि त्यांचेच नुकसान असेल. आयसीसी बोर्डच्या बैठकीत मी ज्या गोष्टी ऐकल्या, त्या अत्यंत धक्कादायक होत्या.”