बांगलादेशचा संघ ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर पोहोचला आहे. कसोटी मालिकेपूर्वी बांगलादेशचा संघ सराव सामना खेळत आहे. पण या सामन्यात संघाच्या निराशा पदरी पडली. ऑस्ट्रेलिया दौऱ्यावरील कसोटी मालिका सुरू होण्यापूर्वीच, बांगलादेशच्या क्रिकेट संघाला डार्विनमध्ये अत्यंत निराशाजनक पराभवाचा सामना करावा लागला. ‘क्रिकेट ऑस्ट्रेलिया इलेव्हन’ विरुद्धच्या तीन दिवसांच्या सराव सामन्यात बांगलादेशचा एक डाव आणि ३८ धावांनी मानहानीकारक व एकतर्फी पराभव झाला.

या सराव सामन्याच्या दुसऱ्या डावात बांगलादेशची फलंदाजी जणू पत्त्यांच्या बंगल्याप्रमाणे कोसळली आणि संपूर्ण संघ अवघ्या ५४ धावांत बाद झाला. याचं श्रेय ऑस्ट्रेलियाच्या नव्या गोलंदाजाला जातं. गोलंदाज थॉम्पसन कॅम्पबेलने एकट्याने ८ विकेट्स घेत बांगलादेशच्या फलंदाजांना आस्मान दाखवलं.

कोण आहे कॅम्पबेल थॉम्पसन?

बांगलादेशला गुडघे टेकायला भाग पाडणारा २२ वर्षीय वेगवान गोलंदाज कॅम्पबेल थॉम्पसन दक्षिण ऑस्ट्रेलियासाठी देशांतर्गत क्रिकेट खेळतो. या डावखुऱ्या मध्यम-वेगवान गोलंदाजाने दुसऱ्या डावात एकट्याने ८ बळी टिपत बांगलादेशची फलंदाजीची फळी उध्वस्त केली. त्याने ११ षटकांत केवळ २५ धावा देत ही कामगिरी करून दाखवली. त्याने पहिल्या डावातही एक बळी मिळवला होता.

१८ जानेवारी २००४ रोजी जन्मलेल्या थॉम्पसनला प्रथम श्रेणी क्रिकेटचा जवळपास कोणताही अनुभव नाही. त्याने १० फेब्रुवारी २०२६ रोजी ‘वन-डे कप’मध्ये न्यू साउथ वेल्सविरुद्ध ‘लिस्ट-ए’ (List-A) क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. त्यानंतर, १६ फेब्रुवारी २०२६ रोजी त्याने क्वीन्सलँडविरुद्ध ‘शेफील्ड शील्ड’मधील आपला पहिला आणि एकमेव सामना खेळला. असं असूनही, त्याने आपल्या भेदक गोलंदाजीच्या बळावर बांगलादेश संघाला नमवलं.

सामन्याच्या पहिल्या डावात, मेहदी हसन मिराजच्या नाबाद शतकाच्या जोरावर बांगलादेशने २६३ धावा केल्या. त्याला प्रत्युत्तर म्हणून, ‘क्रिकेट ऑस्ट्रेलिया इलेव्हन’ने पहिल्या डावात ३५५ धावांची भक्कम धावसंख्या उभारली, ज्यामध्ये टीग वायलीच्या १३० धावांच्या शानदार शतकाचा मोलाचा वाटा होता आणि अशा प्रकारे त्यांनी बांगलादेशवर ९२ धावांची आघाडी घेतली. मात्र, ९२ धावांनी पिछाडीवर असताना दुसऱ्या डावात बांगलादेशी संघाची फलंदाजी पूर्णपणे कोलमडली.

दुसऱ्या डावात, सलामीवीर तन्झिद हसनचा अपवाद वगळता बांगलादेशच्या एकाही फलंदाजाला दुहेरी धावसंख्या गाठता आली नाही. एकापाठोपाठ एक विकेट्स पडल्यामुळे संपूर्ण संघ ५४ धावांत गारद झाला आणि त्यांना एका डावाने पराभव स्वीकारावा लागला. बांगलादेशचा डाव गुंडाळण्यासाठी ऑस्ट्रेलियाला केवळ २२ षटकं टाकावी लागली; या कामगिरीत २२ वर्षीय कॅम्पबेल थॉम्पसनचा मोलाचा वाटा होता, ज्याने बांगलादेशच्या फलंदाजांना झटपट माघारी धाडलं.