बांगलादेश आणि भारत यांच्यातील दुरावलेल्या संबंधाच्या पार्श्वभूमीवर बांगलादेश क्रिकेट बोर्डाने टी२० वर्ल्डकपसंदर्भात आयसीसीकडे गट बदलण्याची विनंती केली आहे. ब गटातल्या आयर्लंडऐवजी बांगलादेशचा विचार व्हावा जेणेकरून सामने श्रीलंकेत खेळता येतील असं बांगलादेश क्रिकेट बोर्डाचं म्हणणं आहे.
टी२० वर्ल्डकपच्या संरचनेनुसार, बांगलादेशचा संघ क गटात असून, त्यांचे सामने वेस्ट इंडिज, इटली, इंग्लंड, नेपाळ यांच्याशी होणार आहेत. त्यांचे सामने कोलकाता आणि मुंबई इथे होणार आहेत. आयर्लंडचा संघ ब गटात असून त्यांचे सामने श्रीलंका, ऑस्ट्रेलिया, ओमान, झिम्बाब्वे यांच्याशी होणार आहेत. हे सामने कोलंबो आणि पल्लेकल इथे होणार आहेत.
बांगलादेशने भारतातच खेळावं यासंदर्भात आयसीसीची दोन सदस्यीय शिष्टमंडळ ढाक्यात होतं. यामध्ये इव्हेंट्स अँड कॉर्पोरेट कम्युनिकेशन्स जनरल मॅनेजर गौरव सक्सेना आणि इंटिग्रिटी युनिटचे जनरल मॅनेजर अँड्यू इपग्रेव्ह यांचा समावेश आहे. भारतात सुरक्षाव्यवस्था कशी आहे याची त्यांनी बांगलादेश क्रिकेट बोर्डाला माहिती दिली.
बांगलादेश क्रिकेट बोर्ड आणि आयसीसीचे प्रतिनिधी यांच्यात बैठक झाली. इपग्रेव्ह या बैठकीला प्रत्यक्ष उपस्थित होते. गौरव यांना व्हिसा मिळू न शकल्याने ते या बैठकीला व्हर्च्युल पद्धतीने उपस्थित होते. बैठकीदरम्यान आमचे सामने श्रीलंकेत हलवण्यात यावेत या मागणीचा बांगलादेश क्रिकेट बोर्डाने पुनरुच्चार केला. सरकार, खेळाडूंची सुरक्षितता, चाहते, प्रसारमाध्यमं आणि बांगलादेश क्रिकेटशी संलग्न पाठीराखे यांच्या भावनाही लक्षात घेणं आवश्यक आहे असं बांगलादेश क्रिकेट बोर्डाने म्हटलं आहे.
बांगलादेश क्रिकेट बोर्डाच्या वतीने मोहम्मद अमिनुल इस्लाम, उपाध्यक्ष शकवाह होसेन आणि फारुक अहमद, संचालक नझमुल अब्दीन, मुख्य कार्यकारी अधिकारी निझाम उद्दीन चौधरी उपस्थित होते. बैठकीत सामंजस्याने चर्चा झाली. बांगलादेशला अन्य गटात नेल्यास व्यवस्था होऊ शकते का यावरही बैठकीत उहापोह करण्यात आला असं आयसीसीने म्हटलं आहे.
दरम्यान बांगलादेश क्रिकेट बोर्डाची विनंती स्वीकारण्यास आयसीसीने तयारी दर्शवली नाही. गट बदलल्यास सगळं वेळापत्रक, राहण्याची-प्रवासाची व्यवस्था बदलावी लागेल. सर्वच संघांना याचा फटका बसेल असं आयसीसीने नमूद केलं. खेळाडूंच्या सुरक्षिततेच्या मुद्यावरून सामने भारताऐवजी श्रीलंकेत व्हावेत अशी बांगलादेश क्रिकेट बोर्डाची मागणी आहे.
बांगलादेशातील सामाजिक परिस्थिती संवेदनशील आहे. बांगलादेशात हिंदू नागरिकांवर होणाऱ्या हल्ल्यांवरून भारतात आंदोलनं झाली. लोकभावनेचा विचार करत बीसीसीआयने आयपीएल स्पर्धेतून मुस्ताफिझूर रहमानला रिलीज करण्याचा निर्णय घेतला. कोलकाता नाईट रायडर्स संघाने ९.२ कोटी रुपये मोजून मुस्ताफिझूरला ताफ्यात समाविष्ट केलं होतं.
या निर्णयाने समीकरणं बदलली. बांगलादेश क्रिकेट बोर्डाने आयपीएल प्रसारणावर बंदी घालण्याचा निर्णय घेतला होता.
