scorecardresearch

IND vs BAN: अ‍ॅलन डोनाल्डने भारताच्या मुख्य प्रशिक्षकाची मागितली जाहीर माफी! राहुल द्रविडची खास प्रतिक्रिया पाहा video

अॅलन डोनाल्ड आणि राहुल द्रविड सध्या बांगलादेश आणि भारताच्या कोचिंग स्टाफचा भाग म्हणून चट्टोग्राममध्ये आहेत. अॅलन डोनाल्ड यांनी द्रविडची माफी मागत त्यांना जेवणाचे आमंत्रण दिले आहे.

Bangladesh coach Alan Donald apologized publicly to India's head coach Watch Rahul Dravid's special reaction
सौजन्य- (ट्विटर)

अ‍ॅलन डोनाल्ड हा जगातील सर्वात भयानक वेगवान गोलंदाज म्हणून ओळखला जात असे. धडाकेबाज वेगवान खेळाव्यतिरिक्त, हा माजी वेगवान गोलंदाज देखील त्याच्या स्लेजिंगने फलंदाजांना घाबरवायचा. १९९७ मध्ये डर्बन येथे एकदिवसीय सामन्यादरम्यान दिग्गज फलंदाज आणि सध्याचे भारताचे प्रशिक्षक राहुल द्रविड डोनाल्डच्या वेगाचे आणि स्लेजचे बळी ठरले होते.

दोन दशकांहून अधिक काळानंतर, बांगलादेशचे सध्याचे गोलंदाजी प्रशिक्षक डोनाल्ड यांनी त्यांच्या चुकीच्या वर्तनाबद्दल द्रविडची जाहीर माफी मागितली आणि भारताच्या मुख्य प्रशिक्षकाला जेवणासाठी आमंत्रित केले. सोनी स्पोर्ट्स नेटवर्कला दिलेल्या मुलाखतीत डोनाल्डने कबूल केले की डर्बनमधील त्या एकदिवसीय सामन्यात द्रविड सोबत स्लेजिंग करताना त्यांनी सीमा ओलांडली होती.

“डर्बनमधील ती एक वाईट घटना घडली होती ज्याबद्दल मला बोलायचे नाही. तो (राहुल द्रविड) आणि सचिन आम्हाला सर्व विभागात भारी पडत होते. मी थोडीशी मर्यादा ओलांडली होती. मला राहुलबद्दल प्रचंड आदर आहे. दुसरी कोणतीही गोष्ट माझ्या मनात नाही. मला बाहेर जाऊन राहुलसोबत बसायचे आहे आणि त्या दिवशी जे घडले त्याबद्दल त्याला पुन्हा सॉरी म्हणायचे आहे. मला काहीतरी मूर्खपणाचे करायचे होते ज्यामुळे त्याची विकेट प्रत्यक्षात आली. पण तरीही मी त्या दिवशी जे बोललो त्याबद्दल मी माफी मागतो. काय माणूस आहे, किती छान आहे. राहुल, तू ऐकत असशील तर. मला तुझ्याबरोबर रात्रीचे जेवण करायला आवडेल,” डोनाल्ड म्हणाले.

द्रविडला एका वेगळ्या मुलाखतीत हा डोनाल्डचा संदेश दाखवण्यात आला. डोनाल्डच्या जेवणाच्या आमंत्रणाला प्रतिसाद देताना, भारताचे प्रशिक्षक आनंदाने म्हणाले की, “नक्कीच, मी त्याची वाट पाहत आहे, विशेषतः जर तो पैसे देत असेल तर नक्कीच” उल्लेखनीय म्हणजे, डोनाल्ड आणि द्रविड सध्या अनुक्रमे बांगलादेश आणि भारताच्या कोचिंग स्टाफचा भाग म्हणून चट्टोग्राममध्ये आहेत. दोन्ही बाजू सध्या कसोटी मालिका खेळत आहेत, जी सध्या सुरू असलेल्या जागतिक कसोटी अजिंक्यपदाच्या चक्राचा एक भाग आहे.

मराठीतील सर्व क्रीडा ( Krida ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 15-12-2022 at 21:48 IST
ताज्या बातम्या